गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याला नोटीस

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याला नोटीस
रायपूर : छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे दसऱ्याच्या पारंपरिक शस्त्रपूजनादरम्यान महिला आयपीएस अधिकारी अंकिता शर्मा यांनी एके-४७ रायफलमधून हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यामुळे सुरक्षा आणि शिस्तीच्या नियमांवर प्रश्न उपस्थित झाल्याने पोलिस मुख्यालयाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मंगळवारी पोलिस लाइन्समध्ये हा प्रकार घडला. यामुळे पोलिसांच्या प्रतिमेला धक्का लागल्याचे मुख्यालयाचे मत असून, त्यांच्या स्पष्टीकरणानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे महानिरीक्षक अजय यादव यांनी सांगितले.

डिलिव्हरी कर्मचाऱ्याची मारहाणीनंतर आत्महत्या
नवी दिल्ली : विनोदनगर भागात फाटलेली चलनी नोट स्वीकारण्यास नकार दिल्याने दोन व्यक्तींनी मारहाण केल्यानंतर २४ वर्षीय समीर हुसेन या डिलिव्हरी कर्मचाऱ्याने २० ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली. चार ऑक्टोबरला समीरला राकेश ऊर्फ बंटी (३०) आणि रामपाल सिंह (६५) यांनी मारहाण केली होती. याचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर समीरने पाच ऑक्टोबर रोजी कथितरीत्या विषारी पदार्थ प्राशन केला. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

दिलजितच्या कार्यक्रमास परवानगी नाही

नवी दिल्ली : पंजाबी गायक दिलजित दोसांझ यांच्या ३० ऑक्टोबर रोजी जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर नियोजित असलेल्या कार्यक्रमासाठी दिल्ली पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव आणि सणासुदीच्या हंगामाचे कारण देऊन परवानगी नाकारल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी रोखून धरली असली, तरी यामागील कारणांबाबत अधिक तपशील उपलब्ध झाले नाहीत.

सोनिया गांधी इन्स्टाग्रामवर

नवी दिल्ली : काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या आगामी ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्राच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर पदार्पण केले आहे. पहिल्या पोस्टमध्ये त्यांनी पुस्तकाची पहिली प्रत स्वीकारतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हे पुस्तक दहा नोव्हेंबर रोजी हार्परकॉलिन्स इंडियाकडून प्रकाशित होणार आहे. यामध्ये त्यांच्या इटलीमधील बालपणापासून ते भारतात आल्यावर घेतलेला शोध, राजीव गांधी यांच्याशी विवाह, कौटुंबिक दु:ख आणि २००४च्या राजकीय घडामोडींपर्यंतचा प्रवास मांडण्यात आला आहे.