रेल्वे प्रवाशांनी वाचला समस्यांचा पाढा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
railway passengers present a discourse on issues complaints and solutions
(पान एकवरून)

आरक्षण व्यवस्थेपासून दिव्यांग सुविधांपर्यंत आणि एसी लोकलच्या दरांपासून महिला लोकल फेऱ्यांपर्यंत अनेक मुद्द्यांवर प्रवाशांनी प्रशासनाला थेट जाब विचारला.
सीएसएमटी येथे झालेल्या संवाद कार्यक्रमात केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाच्या सचिव निवेदिता शुक्ला-वर्मा, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव उपस्थित होते. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक रामाश्रय पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई सेंट्रल येथे प्रवासी संवाद उपक्रम पार पडला.

‘सीएसएमटीत रोज सुमारे १२ लाख प्रवासी हाताळले जातात. उपनगरी रेल्वेवरील एकूण प्रवासी संख्या लाखोंमध्ये आहे. एवढी गर्दी हाताळणे, त्यांना सुविधा आणि सुरक्षा देणे हे मोठे आव्हान आहे. प्रवाशांनी काही बाबींवर समाधान व्यक्त केले असले, तरी स्थानकांमध्ये आणखी सुधारणा शक्य आहे. प्रवाशांचे म्हणणे, सूचना आणि तक्रारी ऐकून घेण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. डिजिटल माध्यमातूनही प्रवाशांना आपले म्हणणे मांडता येईल. तक्रारींची दखल घेऊन मध्य रेल्वेकडून निश्चित सुधारणा करण्यात येईल’, अशी ग्वाही शुक्ला-वर्मा यांनी दिली. प्रवाशांनी यावेळी दैनंदिन प्रवासातील अडचणींचा थेट पाढाच मांडला. लोकल सातत्याने विलंबाने धावत असल्याने कार्यालयीन वेळा, शाळा-कॉलेज आणि इतर कामकाजावर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. गर्दीच्या तुलनेत लोकलमधील सुविधा अपुऱ्या पडत असून, महिलांच्या डब्यांची आणि महिला लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात आली. गर्दीच्या वेळेत ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह प्रवास करणे कठीण होत असल्याने त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी स्वतंत्र उपाययोजना करण्याची अपेक्षाही व्यक्त झाली.

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांनी एसी लोकलच्या तिकीट दरांवर विशेष आक्षेप नोंदवला. एसी लोकलचे तिकीट दर कमी करावेत, तसेच प्रथम श्रेणी तिकीटधारकांना फरकाची रक्कम भरून एसी लोकलमधून प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. चर्चगेट-विरार मार्गावर एसी लोकल फेऱ्या वाढवणे, तसेच सीएसएमटी ते विरार थेट लोकल सुरू करण्याची सूचनाही प्रवाशांनी केली.

दिव्यांग प्रवाशांच्या अडचणींवरही कार्यक्रमात भर देण्यात आला. दिव्यांग डब्यांतील घुसखोरी रोखावी, राखीव आसने वाढवावीत आणि स्थानकांवर पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. मुंबई सेंट्रलसारख्या मोठ्या स्थानकांवर दिव्यांग प्रवाशांना स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी अधिक सुलभ व्यवस्था असावी, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

मेल-एक्स्प्रेस गाड्यांतील शयनयान डबे कमी करून एसी डबे वाढवण्याच्या प्रवृत्तीवरही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. आरक्षण प्रक्रिया तातडीने ‘रिग्रेट’ होत असल्याने सामान्य प्रवाशांना मोठा फटका बसतो, असेही निदर्शनास आणण्यात आले. लोकलमधील अनधिकृत फेरीवाले आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अभिप्राय अर्ज देऊन त्यांच्या सूचना लेखी स्वरूपात नोंदवल्या. तक्रारी आणि सूचनांची योग्य दखल घेऊन आवश्यक कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले. यावेळी दोन्ही रेल्वे प्रशासनांकडून पथनाट्यांद्वारे स्वच्छता, सुरक्षितता आणि रेल्वे नियमांबाबत जनजागृती करण्यात आली.