ऑडिओ क्लिपवरून राज्यात वादंग

Contributed by: मुंबई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
ऑडिओ क्लिपवरून राज्यात वादंग
‘ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते ५०० कोटी रुपये दिल्याचा उल्लेख असल्याची ऑडिओ क्लिप माझ्याकडे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची सत्यता तपासावी,’ अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी जालना येथे केली. जरांगे यांनी प्रसारमाध्यमांना कथित ऑडिओ क्लिपही ऐकवली. त्यानंतर या क्लिपवरून राज्याच्या राजकारणात वादंग निर्माण झाला.

या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ‘डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना ५०० कोटी रुपये दिले,’ असे वक्तव्य एक महिला करीत असल्याचे ऐकू येते. ही क्लिप जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी या क्लिपची सत्यता तपासण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
‘मराठा समाजाचे काम करतो म्हणून माझ्याविरोधात कट रचले जात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, एका ऑनलाइन मीटिंगमध्ये झालेली चर्चा आहे. त्यात बोलताना एका महिलेने डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मनोज जरांगे यांना ५०० कोटी रुपये दिल्याचा उल्लेख आहे. या क्लिपची मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी आणि सत्यता तपासावी,’ असे जरांगे म्हणाले.

‘माझ्याविरोधात बोलणारे लोक कोण आहेत, त्यांना कशी मदत केली जाते हे सगळे मला माहीत आहे. हे प्रकार ताबडतोब थांबवावेत अन्यथा माझ्याकडे यापेक्षाही अधिक पुरावे आहेत. योग्य वेळ येताच ते उघड करू,’ या शब्दांत जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. जरांगे यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. ‘ही ऑडिओ क्लिप गंभीर असून, यात भाजपच्या सोशल मीडियाशी संबधित श्वेता शालिनी, आमदार अतुल भातखळकर, यूट्यूबर सुशील कुलकर्णी यांच्यासारखा आवाज आहे. मराठा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या या क्लिपची फॉरेन्सिक व सायबर सेलकडून चौकशी व्हावी,’ अशी मागणी मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

 संबंधित वृत्त...४