Establishment Of International Centers In Technical Schools Of Maharashtra To Develop Industry compatible Workforce
उद्योगानुकूल मनुष्यबळ तयार होणार
महाराष्ट्र टाइम्स•
राज्यातील तांत्रिक आणि व्यवसाय शिक्षणाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती येथील शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्रांच्या संचालन व कार्यान्वयनासाठी संस्था व्यवस्थापन समिती स्थापन करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी उद्योजक असणार आहे. या माध्यमातून उद्योगानुकूल मनुष्यबळ तयार होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार, प्रत्येक तांत्रिक विद्यालयातील या समितीमध्ये उद्योग क्षेत्रातील सहयोगी उद्योजक किंवा त्यांचे प्रतिनिधी अध्यक्ष असतील. याशिवाय जिल्ह्यातील नामांकित औद्योगिक आस्थापनांचे चार प्रतिनिधी, तीन तज्ज्ञ व्यक्ती, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, ज्येष्ठ शिक्षक, विद्यार्थी प्रतिनिधी आणि सदस्य सचिव म्हणून तांत्रिक विद्यालयाचे मुख्याध्यापक असे एकूण बारा सदस्य असतील. या केंद्रांचे दैनंदिन कामकाज आणि प्रशासकीय जबाबदारी संबंधित शासकीय तांत्रिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पाहतील. शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय केंद्र स्थापन झाल्यामुळे स्थानिक गरजांनुसार आणि आधुनिक उद्योग जगताच्या मागणीनुसार विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण व कौशल्य विकास प्रशिक्षण मिळणे सुलभ होणार आहे. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या थेट सहभागामुळे विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या संधींमध्येही वाढ होईल.