आठवडाही बाजारासाठी तसा दिशाहीन राहिला. पुढील महिन्याचे रोलओव्हर सुद्धा फारसे उत्साहवर्धक दिसून आले नाही. आर्थिक जगतातील बातम्याही फारशा काही बाजारावर परिणाम करतील अशा नव्हत्या. एकंदरीतच बाजार अजून काही नवा ट्रेंड पकडेल असे दिसून येत नाही. काही नाही तरी नवीन संरक्षण क्षेत्रातील निगडित धोरणे आणि सरकारी क्षेत्रातील काही कंपन्यांच्या हिस्सेदारीची विक्री यातून भांडवल उभे करणे, परकीय भारतीयांकडून भारतात गुंतवणूक वाढवणे अशा उपायोजना यावरच जास्त धोरणाचा भर दिसून आला. अशा सर्व गोष्टीची नोंद घेत मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक अनुक्रमे ७७,२६४ (+३३०) व २४,१७५ (+८४) असा बंद झाला.
पण ह्या जागतिक आव्हाने आणि अस्थिरतेच्या वातावरणातही भारतीय अर्थव्यवस्था २०२६ मध्ये मजबूत गतीने पुढे सरकत असून ती जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ठरली आहे. सरकारच्या सांख्यिकीबाबत मतमतांतरे असू शकतात. पण एकंदरीतच अर्थव्यवस्था स्थिर राहणे महत्त्वाचे. सध्याच्या घडीला भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडी आणि विभागीय घडामोडी पुढीलप्रमाणे आहेत जीडीपी वाढ आणि आर्थिक स्थिती, दमदार विकास दर : आर्थिक वर्ष २०२५-२६ (FY26) मध्ये भारताचा वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर ७.७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
जागतिक स्थान : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या आकडेवारीनुसार, नाममात्र (Nominal) जीडीपीच्या बाबतीत भारत ४.१५ ट्रिलियन डॉलरसह जगातील सहावी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे. २०२७ पर्यंत भारत जपान आणि जर्मनीला मागे टाकून तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा अंदाज आहे.
भविष्यातील अंदाज : संयुक्त राष्ट्र संघ (UN) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मते, आगामी काळात जागतिक मंदी आणि निर्यातीवरील टेरिफचे परिणाम असूनही भारताचा वेग ६.४% ते ६.६% च्या आसपास कायम राहील.
सेवा क्षेत्र - भारताच्या आर्थिक वाढीमध्ये सेवा क्षेत्राचे (आयटी, डिजिटल इंजिनिअरिंग, बिझनेस सर्व्हिसेस) मोठे योगदान राहिले असून ते मुख्य ‘ग्रोथ इंजिन’ ठरत आहे.
उत्पादन क्षेत्र : मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात विद्युत उपकरणे (२०.८%) आणि मोटार वाहने (१४.५%) च्या उत्पादनात मोठी वाढ नोंदवली गेली आहे.
कृषी क्षेत्र : देशांतर्गत अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी शेती क्षेत्राला उद्योग म्हणून चालना देण्यावर चालू धोरणांमध्ये भर दिला जात आहे. तसेच भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनला आहे.
तेव्हा आपणही नकारात्मक न राहता बाजारात काय संधी उपलब्ध आहेत यावर लक्ष दिल्यास योग्य ठरेल. त्यानुसार काही समभाग सुचवत असून आपल्या सल्लागाराची मदत घेऊन त्यात गुंतवणूक करावी. कदाचित सांगितलेल्या कालावधीपेक्षा जास्त वेळ लागेल पण संयमाने गुंतवणुकीवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. तक्त्यात दिलेले समभाग सध्याच्या बाजारात टेक्निकल चार्टनुसार कमाल पातळीवर स्थिरावलेले वाटत असून सध्याच्या बाजाराच्या परिस्थितीत योग्य वाटत आहेत. सोमवारी बाजार कसा उघडतो आणि पुढील आठवड्याची दिशा ठरवतो हे पाहणे योग्य ठरेल.