रसायनांची दर्जेदार निर्मिती

Contributed by: वैभव वझेVaibhav.vaze@timesofindia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
रसायनांची दर्जेदार निर्मिती
उद्योगे प्रचीती येते। आळसे कल्पनेचे सुख होते। याकारणे आळस तो त्यागावा। उद्योगचि करावा।।

असं समर्थ रामदास स्वामी म्हणून गेले. या वचनाचा अंगिकार करून वडीलांच्या प्रोत्साहनाने विलास ताम्हनकर यांनी १९७५मध्ये सुरू केलेली एन.एस. केमिकल्स ही कंपनी आज देशाविदेशांत आपला ठसा उमटवत आहे. आज हेच वचन अंगिकारत विलासजींचा मुलगा डॉ. आमोद आणि आमोदजींचा मुलगा अथर्व हा उद्योग नव्या उंचीवर घेऊन जात आहेत.
याविषयी डॉ. आमोद सांगू लागले, माझे आजोबा राजापूरहून मुंबईत आले आणि टपाल खात्यात नोकरीला लागले. त्यांचा मुलगा विलास, म्हणजे माझे वडील बीएससी झाल्यानंतर ते बॉम्बे केमिकल्स प्रा.लि. या कंपनीत केमिकल विभागात नोकरीला लागले. या कंपनीचे मालक गोखले माझ्या आजोबांचे मित्र होते. माझ्या आजोबांचं स्वप्न होतं की, माझ्या मुलाने नोकरी न करता व्यवसाय करावा. म्हणून त्यांनी गोखलेंना त्याबद्दल विचारलं. गोखलेे साहेबांच्या मदतीने आम्ही कंपनीची सुरुवात १९७५मध्ये झाली. बेन्झिल क्लोराइड हे आम्ही सुरू केलेलं पहिलं स्वतंत्र उत्पादन. पावणे इथे आमचा कारखाना आहे.

पेण्ट उद्योग, औषध उद्योग, कृषीरसायन उद्योग यांना लागणारी रसायने एन.एस. केमिकल्स तयार करायला लागली. आमोदजींनी केमिस्ट्री घेऊन एमएससी केलं आणि तेही वडीलांबरोबर १९९७पासून कारखान्यात काम पाहू लागले. कंपनीने अण्टीफंगल केमिकल विकसित केलं, जे केमिकल १९९५मध्ये यूकेला निर्यात केलं गेलं. यशस्वी निर्यातीमुळे कंपनीचा हुरूप वाढला आणि कंपनीने विस्तार करायचं ठरवलं. एन.एस. केमिकल्स खऱ्या अर्थाने आज ओळखली जाते ती निर्जंतुकीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या द्रव्याचा मुख्य घटक उत्पादित करण्यासाठी. पॅरा क्लोरो मेटा झायलेन हे ते उत्पादन आज कंपनीला बाजारात चेहरा देणारं उत्पादन ठरलंय. हे उत्पादन २१ देशांना निर्यात केलं जातं. भारतीय कंपन्यांना जागतिक दर्जाची उत्पादनं तयार करता येतात, मात्र ती किफायतशीर दरात करता येत नाहीत. या अनुषंगाने आमोदजी म्हणाले, यावर मात करण्यासाठी स्वतःचे आर ॲण्ड डी सेंटर आम्ही सुरू केलं. जगात चीनशी स्पर्धा करायची तर आपल्याला आपलं उत्पादन कॉस्ट इफेक्टिव्ह आणि त्याचवेळी उत्तम गुणवत्ता असलेलं असं देता यायला हवं. गेल्या १० वर्षांत क्लोरिनेटेड अण्टिबॅक्टेरियल्स या गटात आम्ही आमची गुणवत्ता राखली आहे आणि एकाधिकारही निर्माण करण्यातही यश आलंय. अर्थात कोणताही व्यवसाय सुविहित चालत नाही. केव्हातरी गमतीशीर प्रसंगही येतात.

यासंदर्भात आमोदजींचे वडील विलास ताम्हनकर म्हणाले, एकदा आम्ही दोन टन माल पाठवला एका कंपनीला. त्यासाठी १०० डब्यांवर लेबल्स नीट चिकटवली. ते बेल्जियम पोर्टला पोहोचलं. तिथं वारावादळ – पाऊस सुरू झाला. सगळी लेबल्स भिजून गेली आणि सुटूनही गेली. ज्या कंपनीला तो माल हवा होता त्यांनी आम्हाला लेबलिंग करून द्या असं सांगितलं. लेबलिंगबरोबरच त्यांना डब्यांवर क्रमांक टाकूनही हवे होते. ते खरोखरंच शक्य नव्हतं. आम्ही त्या कंपनीलाच विनंती केली की तुम्हीच ते डबे उघडून तपासणी करा, आम्ही त्याचे चार्जेस देऊ. बरं आम्ही प्रत्येक डब्याच्या आतल्या बाजूला, झाकणावर क्रमांक घातले होते. त्या कंपनीच्या माणसाने चेकिंग करताना सगळी झाकणं काढून बाजूला ठेवली होती. त्यामुळे आता कोणता डबा कितव्या क्रमांकाचा आहे हे कळण्याचा शेवटचा मार्गही बंद झाला होता. परंतु त्या कंपनीने सहकार्य केलं, आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला सांभाळून घेतलं.

आमोदजींच्या कुटुंबातला सर्वांत तरुण सदस्य आणि त्यांचा मुलगा अथर्व हादेखील आता एन. एस. केमिकल्समध्ये आर ॲण्डी डी इन्चार्ज म्हणून जबाबदारी सांभाळतो आहे. प्रत्येक कृती कागदावर उतरवणं, त्याचा डेटा अद्ययावत ठेवणं, उत्पादनासाठीची सर्व सर्टिफिकेशन्स तंतोतंत असणं आणि ती वेळोवेळी अद्ययावत करणं याकडे अथर्वचं बारीक लक्ष असतं. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही आपण सक्रिय असलंच पाहिजे यावरही त्याचा भर आहे. आजोबा आणि बाबा यांनी जी परंपरा निर्माण केलीय ती शाबूत ठेवून त्याला एआय आणि ऑटोमेशनची जोड देऊन पुढे जायला हवं ही जाणीवही त्याला आहे. आमोदजींच्या पत्नी सानिका यांनी कंपनीच्या वित्त विभागाची तसेच लेखा विभागाची जबाबदारी घेतली आहे. आमोदजींच्या मातोश्री डॉ. रसिका ताम्हनकर या दासबोधाच्या अभ्यासक आहेत. कंपनीच्या मागे त्या खंबीरपणे उभ्या आहेत. संपूर्ण कुटुंबाला समर्थांच्या तत्त्वज्ञानाची बैठक आहे. सज्जनगडाचे आमोदजी विश्वस्त मंडळ सदस्य आहेत.