पडद्यामागील कलावंताच्या साधनेचा सन्मान

महाराष्ट्र टाइम्स•
पडद्यामागील कलावंताच्या साधनेचा सन्मान
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
‘पडद्यामागे काम करणाऱ्या माणसाला पडद्यासमोर आणून त्याचा सत्कार करणे ही मोठी गोष्ट आहे. दिवंगत गणेश नायडू या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित होणे हा माझ्यासाठी सुवर्णक्षण आहे,’ असे मत ध्वनिसंयोजन तज्ज्ञ संदीप बारस्कर यांनी व्यक्त केले.

विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्यावतीने शंकरनगर चौकातील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात उमा-गणेश स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर बारस्कर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंडित शंकरप्रसाद अग्निहोत्री होते. मंचावर विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, सत्कारमूर्ती संदीप बारस्कर, ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी, ज्येष्ठ निवेदक आणि पत्रकार प्रकाश एदलाबादकर, नीलेश खांडेकर, रूपाली मोरे, उपस्थित होते. यावेळी संदीप बारस्कर यांचा उमा-गणेश स्मृती पुरस्काराने सत्कार करण्यात आला. पुष्पहार, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पंचवीस हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
‘दिवंगत गणेश नायडू हे खऱ्या अर्थाने कलेचे उपासक होते. त्यांनी आपल्या अखंड साधनेतून कला व नाट्य क्षेत्रात अत्यंत मोलाचे आणि उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्याच नावाने दिला जाणारा हा पुरस्कार संदीप बारस्कर यांच्यासारख्या गुणी कलावंताला मिळणे, हा त्यांच्या कलासाधनेचा उचित सन्मान आहे,’ असे गौरवोद्गार माजी आमदार संदीप जोशी यांनी काढले. एदलाबादकर यांनी गणेश नायडू यांच्या अक्षरकलेपासून नेपथ्य कौशल्यापर्यंतच्या विविध गुणांची आठवण सांगितली. त्यांनी मंचावरील संदीप जोशी आणि संदीप बारस्कर यांच्या कष्टाळू व शिस्तबद्ध स्वभावाचाही आवर्जून उल्लेख केला.

डॉ. गिरीश गांधी यांनी प्रास्ताविकातून जुन्या आठवणींना उजळा दिला. शुभदा फडणवीस यांनी सूत्रसंचालन केले, तर नीलेश खांडेकर यांनी आभार मानले.