राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी आधीच सुरू झाली आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्याकडे पत्र देऊन या प्रकरणी सीबीआय चौकशी ची मागणी केली असून, मी तत्काळ केंद्र सरकारला पत्र लिहले आहे. याबाबत मी स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली असून, या प्रकरणाचे तथ्य समोर आले पाहिजे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी आपण करणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
कोणाच्या मनात जर शंका असतील, तर त्यांनी त्या डीजीसीए किंवा आमच्याकडे द्याव्यात. त्यांचा निश्चित विचार करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात लाचखोरीचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत, असे स्पष्ट केले.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात चहापानाचे आयोजन करण्यात आले होते. या चहापानाच्या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरील भूमिका जाहीर केली. या वेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषदेत भाग घेतला.
दरम्यान, ‘मी सहा मार्चला अर्थसंकल्प मांडणार आहे. अजित पवारांनी या अर्थसंकल्पासाठी प्रचंड तयारी केली होती. दुर्दैवाने हा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ माझ्यावर आली. कुठल्याही मुख्यमंत्र्याना अर्थ खाते निर्धास्तपणे देता येईल, असे अर्थमंत्री अजितदादा होते. सुनेत्रा वहिनी दादांप्रमाणे ठामपणे अधिवेशनाला सामोऱ्या जातील,’ असे फडणवीस म्हणाले.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आज, सोमवारपासून सुरुवात होणार असून या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला.
सविस्तर वृत्त...५



