मनमाड ते परभणी दरम्यान सिंगल लाइनवरून धावणाऱ्या रेल्वेच्या जोरांवर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनने वर्ष २०२४-२५मध्ये १०४ कोटी ५६ लाख ५४ हजार ९१९ रुपयांचा विक्रमी आकडा गाठला आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या टॉप टेन उत्पन्न मिळवून देणाऱ्या रेल्वे स्टेशनमध्ये छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनचा समावेश झालेला आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या अंतर्गत असलेल्या विविध रेल्वे स्टेशनच्या उत्पन्नाची माहिती देण्यात आली आहे. ही माहिती वर्ष २०२४ - २५ची आहे. या अंतर्गत सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या रेल्वे स्टेशन मध्ये पहिला क्रमांक सिकंदराबाद, विजयवाडा, तिरूपती, काचीगुडा, हैदराबाद, नांदेड, राजमुंद्री, लिंगमपल्ली, छत्रपती संभाजीनगर आणि रेनीगुंटा या दहा टॉप टेन रेल्वे स्टेशन असल्याची माहिती देण्यात आली आहे. या टॉप टेन रेल्वे स्टेशननंतर गुंटूर, नेल्लोर, वरंगल, समालकोट, ओंगाली, काकीनाडा टाउन, खम्मम, निजाझाबाद नंतर २० व्या क्रमांकावर परभणीचा नंबर लागत आहे. यानंतर २९ व्या क्रमांकावर जालना असून, ३१व्या क्रमांकावर नगरसोल चा समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगर ते मनमाड मार्गावर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. आगामी काही वर्षात परभणी ते छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण होणार आहे. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतर, या मार्गावर रेल्वेची संख्या वाढणार आहे. रेल्वेची संख्या वाढल्यानंतर रेल्वे स्टेशनचे उत्पन्नही वाढणार आहे. अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.



