‘राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या जागेवर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी दावा केल्यानंतर आता काँग्रेस नेही या जागेसाठी शड्डू ठोकला आहे. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावे आणि राज्यसभेची जागा काँग्रेसला द्यावी, अशी थेट मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. एकीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेवर संधी देण्याची मागणी होत असताना महाविकास आघाडीतील या दोन्ही पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.
राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यातील सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. सध्याचे राज्यातील पक्षीय बलाबल लक्षात घेता पाच जागांवर महायुती तर एका जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येण्याची स्थिती आहे. पूर्वी शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार राज्यसभेवर निवडून गेला होता. आता मात्र, एकच उमेदवार निवडून येण्याची शक्यता असल्याने या जागेवर नेमका कोणी दावा करायचा यावर महाविकास आघाडीत खडाजंगीला सुरुवात झाली आहे.
आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेच्या जागेवर शिवसेनेचा दावा सांगितला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यसभेची जागा काँग्रेससाठी मागितली. ‘महाविकास आघाडीच्या आजच्या अधिवेशनपूर्व बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार का गैरहजर राहिले, हे माहिती नाही,’ असे सपकाळ म्हणाले.



