Discovery Of Poisoned Arrows From 60000 Years Ago A Unique Tale Of Human Intelligence
प्रत्यंचेवरील विषबाण
महाराष्ट्र टाइम्स•
दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या बाणांमुळे एक मोठे सत्य समोर आले आहे. सुमारे ६० हजार वर्षांपूर्वीच मानव विषारी बाणांचा वापर करत होता. हे बाण क्वार्ट्झपासून बनवलेले होते. या बाणांवर विषारी वनस्पतींचे अंश आढळले आहेत. यावरून त्या काळातील मानवाची बुद्धिमत्ता आणि शिकारीची प्रगत पद्धत दिसून येते. हे ज्ञान पिढ्यानपिढ्या जात असावे.
मानवाने सुमारे ६० हजार वर्षांपूर्वीच विषारी बाणांचा वापर सुरू केला होता, हे दक्षिण आफ्रिकेतील उम्हलातुझाना रॉक शेल्टर येथे सापडलेल्या अवशेषांवरून स्पष्ट झाले आहे. पूर्वी हा काळ २० ते ३० हजार वर्षांपूर्वीचा मानला जात होता. मात्र, आता सापडलेल्या क्वार्ट्झच्या बाणांच्या टोकांवर विषारी वनस्पतींचे अंश आढळल्याने मानवी बुद्धिमत्तेचा आणि शिकारीच्या तंत्राचा इतिहास अधिक जुना आणि प्रगत असल्याचे सिद्ध झाले आहे.
या संशोधनामुळे शिकारीच्या पद्धतींबद्दलची आपली जुनी समजूत बदलली आहे. साध्या बाणांनी प्राणी जखमी झाले तरी पळून जाऊ शकतात, पण विषबाणांनी ते लगेच गलितगात्र होतात आणि त्यांना मारणे सोपे जाते. उम्हलातुझाना येथे सापडलेल्या बाणांची टोके क्वार्ट्झपासून बनवलेली आहेत. क्वार्ट्झ हा दगड सहज तुटतो, त्यामुळे त्यावर काम करणे अवघड असते. तरीही, ही टोके अतिशय तीक्ष्ण आणि सममित (एकाच आकाराची) आहेत. ही वैशिष्ट्ये मध्य पाषाणयुगातील (साधारण ९० ते ६० हजार वर्षांपूर्वी) प्रगत दगडी हत्यारांशी मिळतीजुळती आहेत.या बाणांच्या टोकांवर अतिसूक्ष्म सेंद्रिय अवशेष शिल्लक होते. गॅस क्रोमॅटोग्राफी- मास स्पेक्ट्रोमेट्री (Gas Chromatography-Mass Spectrometry) या वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या विश्लेषणानुसार, 'ब्युफँड्रीन' (Bufandrine) आणि 'एपिब्युफॅनिसिन' (Epibufanicin) हे दोन विषारी अल्कलॉइड्स (alkaloids - वनस्पतींमधील विषारी घटक) तिथे आढळले. हे घटक 'बूफोनी डिस्टिका' (Bufo distica) नावाच्या अत्यंत विषारी वनस्पतीत सापडतात. यावरून हे स्पष्ट होते की, त्या काळातील माणसांना विषारी वनस्पतींमधील घटक वेगळे करणे, ते काळजीपूर्वक हाताळणे आणि विषाचा परिणाम होईपर्यंत शिकारीसाठी संयमाने वाट पाहणे या गोष्टींची चांगली जाण होती.
विष किती प्रमाणात लावल्यास आपल्याला बाधा होणार नाही, याचा विचारही त्यावेळच्या माणसांनी केला असणार. यामागे त्यांचे दीर्घकालीन निरीक्षण आणि अनुभव असणार. हे ज्ञान आणि संयमी नियोजनाचे महत्त्व पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचले असणार. विषबाण वापरून शिकारीची युक्ती तब्बल ६० हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात होती, हे खरोखरच थक्क करणारे आहे.
संशोधकांच्या मते, अशा प्रकारच्या शिकारी तंत्राचा वापर इतर ठिकाणीही झाला असण्याची शक्यता आहे. या शोधातून मानवी बुद्धिमत्तेचा इतिहास आपल्याला वाटतो त्यापेक्षा कितीतरी गुंतागुंतीचा आणि प्रगत होता, हे ठळकपणे समोर येते. डॉ. मेघश्री दळवी यांनी यावर प्रकाश टाकला आहे.