राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुबी हॉल क्लिनिकने दिली.
शरद पवार यांना दोन दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल, अशी माहिती रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रँट आणि फिजिशियन डॉ. अभिजित लोढा यांनी दिली. पवार यांना यापूर्वी घसादुखी आणि छातीत कफ झाल्याने नऊ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर १४ फेब्रुवारीला घरी सोडण्यात आले होते.



