A Litigant Causing Chaos Removed From Supreme Court
गोंधळ घालणाऱ्या पक्षकाराला बाहेरचा रस्ता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी एक नाट्यमय प्रसंग घडला. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरू झाली. याचिकाकर्ता स्वत:च आपली बाजू मांडण्यासाठी उठला. त्याने थेट न्याय देणाऱ्या न्यायमूर्तींनाच आदेश देत असल्याचे सांगत असंसदीय भाषा वापरली आणि खटल्यासंबंधित कागदपत्रे भिरकावली. सारा न्यायकक्ष अवाक झाला. सुरक्षारक्षकांनी लागलीच या व्यक्तीला बाहेर काढले.
न्या. के. व्ही. विश्वनाथन आणि न्या. आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर हा प्रकार घडला. सुनावणीच्या सुरुवातीलाच, पक्षकाराने आक्रमक पवित्रा घेतला. ‘न्यायलयीन सेवक महोदय, मी तुम्हाला आदेश देतो की, लखनऊच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश तुम्ही द्यावेत,’ असे या पक्षकाराने खंडपीठासमोर सांगितले. त्याने वकिलांच्या बँडविना काळ्या रंगाचा कोट परिधान केला होता. यावर ‘तुम्ही मला, आम्हाला आदेश देत आहात?,’ असे न्या. विश्वनाथन यांनी आश्चर्यचकित होऊन विचारले. ‘माझ्या बाजूने एवढेच सांगायचे आहे. सर्व काही नोंदीवर आले आहे,’ असे म्हणत त्या पक्षकाराने असंसदीय भाषा वापरत आपल्या खटल्याशी संबंधित कागदपत्रे हवेत भिरकावून दिली. यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लागलीच हस्तक्षेप केला. त्याला न्यायकक्षातून बाहेर काढले. यानंतर न्यायालयाचे कामकाज सुरू झाले. या घटनेबाबत न्यायालयाने तत्काळ कोणताही आदेश दिला नाही.