‘टीईटी’ गैरव्यवहार फडणवीसांच्या काळात

Contributed byउपनेत्या शिवसेना उबाठा,पुणे|महाराष्ट्र टाइम्स

सुषमा अंधारे यांचा दावा

‘टीईटी’ गैरव्यवहार फडणवीसांच्या काळात
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
‘शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी घोटाळा उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात झाला नसून, २०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि विनोद तावडे शिक्षणमंत्री असताना झाला होता. ठाकरे सरकारने हा घोटाळा उघडकीस आणून संबंधितांवर कारवाई केली,’ असा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

फडणवीस यांनी टीईटी घोटाळ्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांना उत्तर देताना अंधारे म्हणाल्या, ‘टीईटी परीक्षा प्रक्रियेचे कंत्राट फडणवीस सरकारच्या पहिल्या कार्यकाळात (२०१४ ते १९) देण्यात आले होते. त्यानंतर ठाकरे सरकारच्या काळात गैरव्यवहार उघडकीस आला आणि या प्रकरणातील संबंधितांवर कारवाई करण्यात आली. ठाकरे सरकारने पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना अटक केली. मात्र, त्यानंतर त्यापैकी काहींना सत्ताधारी पक्षात प्रवेश देण्यात आला. त्याचबरोबर परीक्षा घोटाळ्यांचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली, तर कारवाई झालेल्या काही अधिकाऱ्यांना पुन्हा महत्त्वाच्या पदांवर नेमण्यात आले.’