Record breaking Ashadhi Ekadashi 2023 Millions Of Devotees Gather In Pandharpur
विक्रमी आषाढी एकदशीची चाहूल
Contributed by: सोलापूर|महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
राज्याच्या विविध भागांत चांगला पाऊस झाल्याने; तसेच संवर्धन कामानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला प्राप्त झालेल्या पुरातन स्वरूपाचे दर्शन घेण्याची भाविकांमध्ये उत्सुकता असल्याने यंदाची आषाढी यात्रा विक्रमी ठरण्याची चिन्हे आहेत. दशमीपर्यंतच सुमारे १५ लाख भाविक पंढरपुरात दाखल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. एकादशीपर्यंत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दशमीच्या दिवशी पंढरपूर शहरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मिळेल त्या ठिकाणी वारकरी तंबू आणि राहुट्या उभारून मुक्काम करत आहेत. ६५ एकर परिसरासह शहरातील विविध रस्त्यांवर उभारण्यात आलेली मुक्कामस्थळे भाविकांनी भरून गेली आहेत. यंदा सुमारे ३५ लाख भाविक येण्याचा प्रशासनाचा अंदाज असल्याने यात्रेची तयारी आधीपासूनच करण्यात आली आहे.शुक्रवारी दशमीच्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह अन्य संतांच्या पालख्या आणि दिंड्या पंढरपुरात दाखल झाल्या. त्यामुळे शहरातील गर्दीत आणखी भर पडली. सकाळी वाखरी येथे संतभेटीचा कार्यक्रम पार पडला. माऊली आणि जगद्गुरूंच्या पालखी भेटीसाठी अन्य संतांच्या पालख्या वाखरीत आल्या होत्या. त्यानंतर सर्व पालखी सोहळ्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले. मार्गावर ठिकठिकाणी पालख्यांचे स्वागत करण्यात आले. इसबावी परिसरात पंढरपूरकरांनी पालख्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती.
भाविकांची संख्या लक्षात घेऊन मंदिर समितीच्या वतीने दर्शनरांगेत जादा पत्राशेड उभारण्यात आले आहेत. मात्र, गर्दीमुळे ही व्यवस्था अपुरी पडत आहे. दर्शनरांग गोपाळपूरच्या पुढे पोहोचली होती. हजारो भाविक दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. यात्रेसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. पोलिस कर्मचारी, होमगार्ड आणि विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सीसीटीव्ही यंत्रणाही सज्ज आहे.
दरम्यान, यंदाची आषाढी यात्रा विक्रमी होण्याची शक्यता असल्याने व्यापारी वर्गानेही मोठी तयारी केली आहे. प्रासादिक साहित्यांसह विविध वस्तूंची दुकाने सजली आहेत. शहरातील मठ भाविकांनी भरले असून, उपनगरातील मैदानांमध्येही यात्रेकरूंनी मुक्काम केला आहे.
आषाढी एकादशीची शासकीय महापूजा शनिवारी पहाटे २ वाजून २० मिनिटांनी सुरू होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी दुपारीच पंढरपुरात दाखल झाले आहेत. पहाटे मानाच्या वारकरी दाम्पत्यासह ते महापूजा करणार आहेत. पुढील दोन दिवस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पंढरपुरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत.