Worrying Increase Of 443 Suicides In Jalna District
सहा महिन्यांत ४४३ आत्महत्या
Contributed by: पोलिस अधीक्षक,जळगाव|महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
जळगाव जिल्ह्यात आत्महत्यांच्या वाढत्या घटनांनी सामाजिक चिंता वाढवली आहे. १ जानेवारी ते ३० जून २०२६ या सहा महिन्यांत जिल्ह्यात ४४३ नागरिकांनी आत्महत्या केल्याची माहिती जळगाव पोलिस दलाने दिली. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक असून, या काळात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी १२ गुन्हे दाखल केले आहेत.
आकडेवारीनुसार आत्महत्यांमागे कौटुंबिक वाद, आर्थिक अडचणी , मानसिक तणाव, आजारपण आणि व्यसनाधीनता ही प्रमुख कारणे आढळली. मृतांमध्ये ३८३ पुरुष, २९ महिला, ८ मुले आणि ११ मुलींचा समावेश आहे. पुरुषांमध्ये दारूच्या व्यसनामुळे सर्वाधिक ९० घटनांची नोंद झाली. त्यानंतर नैराश्यामुळे ७४, कौटुंबिक कलहातून ६१, कर्जबाजारीपणामुळे ५२ आणि गंभीर आजारपणामुळे ४४ पुरुषांनी आत्महत्या केली. लग्न जमत नसल्याने २९, प्रेमप्रकरणातून ७, मनोरुग्णतेमुळे ६, तर परीक्षेच्या तणावामुळे ४ पुरुषांनी टोकाचे पाऊल उचलले.महिलांमध्ये कौटुंबिक कारणांमुळे ११ आणि नैराश्यामुळे १० घटनांची नोंद झाली. मुलांमध्ये नैराश्य, कौटुंबिक तणाव कारणीभूत ठरला.
औद्योगिक भागासह ग्रामीण भागातही घटना
पोलिस ठाणेनिहाय आकडेवारीचा विचार करता औद्योगिक आणि शहरी भाग असलेल्या एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक ३१ आत्महत्यांच्या घटना घडल्या आहेत. त्यापाठोपाठ पारोळा २८, अमळनेर २३, तालुका पोलिस ठाणे २२, भडगाव २१, मेहुंबरे १९, पहूर १८ आणि रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १८ आत्महत्यांची नोंद झाली आहे. दुसरीकडे सावदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वात कमी म्हणजे १, जिल्हापेठ २, शनिपेठ ५, निंभोरा ६ आणि फत्तेपूर हद्दीत ६ आत्महत्यांच्या घटना घडल्या आहेत.