पुणे, दि. २४ - सध्या रंगभूमीवर चाललेला एकपात्री नाटकांचा प्रयोग म्हणजे प्रेक्षकांवर अत्याचार असून, या मंडळींना सुधारण्याचा एकच मार्ग म्हणजे प्रेक्षकांनी अशा प्रयोगांवर बहिष्कार घालावा, असे मत नामवंत नाटयसमीक्षक केशवराव भोळे यांनी व्यक्त केले. सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मराठी अभ्यास मंडळाचे उद्घाटन भोळे यांनी केले. अध्यक्षस्थानी डॉ. रा. ग. वाळिंबे होते. भोळे यांनी एकपात्री नाटकांच्या प्रयोगाबाबत तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त करून त्याबाबत कडाडून टीका केली.
पु. ल. देशपांडे यांचे प्रयोग ‘एकपात्री’ नसून ‘बहुरूपी’ असल्याने त्यांना या टीकेतून भोळे यांनी पूर्णपणे मुक्त केले. ते म्हणाले, पूर्वी स्त्रियांच्या भूमिका पुरुष पार्टी नट करीत असत. त्यावर कितीतरी टीका झाली. आता स्त्रिया एकाच पुरुषाऐवजी तीन-चार पात्रांचा अभिनय करतात. हा काय अत्याचार? तुम्ही स्त्री आहात, आवाज आहे, रूप आहे, तर मग अशा ‘पुरुषी’ न जमणाऱ्या व न पाहावणाऱ्या भूमिका कशाला करता? ‘एकपात्री’ नाटके हा शक्तीचा आणि काळाचा अपव्यय आहे, म्हणून ती आपण मुळीच पाहात नाही, असेही भोळे यांनी सांगितले.(२५ जुलै १९६६)