जुलैमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठा वाढल्यानंतर शहरातील पाणीकपात रद्द होण्यासह नाशिककरांसोबतच महापालिकेची आर्थिक बचतही झाली आहे.
महापालिकेने दि. ३१ ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी गंगापूर धरण ातील मृतसाठा उचलण्यासाठी धरणात चर खोदकामासाठी काढलेल्या ११.६५ कोटींची निविदेला स्थगिती दिली आहे. गंगापूर धरण आता ९७ टक्के भरले असून, यंदाची पाणीचिंता मिटली आहे. त्यामुळे महापालिकेलाही आर्थिक दिलासा मिळाला आहे. शहराला गंगापूर धरणातून ८० टक्के पाणीपुरवठा केला जातो. दरवर्षी १ ऑक्टोबर ते ३१ जुलै या कालावधीसाठी महापालिकेला धरणांतील पाणी आरक्षण जिल्हा प्रशासनाकडून मंजूर केले जाते. १ ऑक्टोबर २०२५ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीसाठी महापालिकेने ६,४०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण मंजूर करण्यात आले होते. शहराला दररोज सुमारे ६०० दशलक्ष लिटर अर्थात, २१ दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा केला जात आहे. जलसंपदा विभागाने पाण्याचे मंजूर आरक्षण ३१ जुलैऐवजी ३१ ऑगस्टपर्यंत पुरविण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. मात्र, ३१ ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी १८ दिवसांची तूट निर्माण झाली होती.