नियोजित साधुग्राम पाण्याखाली

Contributed byत्र्यंबकेश्वर|महाराष्ट्र टाइम्स

त्र्यंबकमध्ये पावसामुळे सिंहस्थ कामांची दैना

नियोजित साधुग्राम पाण्याखाली
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
शहर आणि परिसरात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने नदी, नाल्यांना आलेला पूर आणि त्यामुळे जलमय झालेला परिसर पाहता सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान अशा प्रकारचा पाऊस झाल्यास निर्माण होणाऱ्या आपत्तीला कसे सामोरे जाणार असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण होऊन अर्धवट बांधलेले घाट आणि आजुबाजुचा परिसर आणि नियोजित साधुग्राम पाण्याखाली गेले.

सरकारी आकडेवारीनुसार त्र्यंबकेश्वर येथे २३ जुलै २०२७ रोजी सकाळपर्यंत २४ तासांत झालेला पाऊस १४१ मिमी इतका नोंदवला गेला. या पावसाने गोदावरी नदीपात्र दुथडीभरून वाहत होते. सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण होऊन अर्धवट बांधलेले घाट आणि आजूबाजूचा परिसर पाण्याखाली गेलेला दिसून आला. भुयारी गटारीला जोडणारा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याकडे जाण्यासाठी गोदावरी नदीला पूल बांधण्यात आला आहे. तो पूल पाण्याखाली बुडाला होता. घाटाच्या लगत विकसीत करण्यात येत असलेल्या रस्त्यांवर चार ते पाच फूट उंचीचे पाणी वाहत होते. साधुग्राम तयार करण्यासाठी विचाराधीन असलेल्या जमिनी पाण्याखाली बुडाल्याने, तर अधिकच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
सिंहस्थ अमृत स्नानासाठी घाट बांधण्यात येत आहेत. त्या घाटांना वाहते पाणी राहावे म्हणून बेझे धरण येथून त्र्यंबकेश्वरपर्यंत १२०० मिमी व्यासाची पाइपलाइन टाकण्यात येत आहे. जुलै महिन्यात ब्रह्मगिरीचे धबधबे वाहते होतात आणि याच महिन्यात अहिल्या धरण ओव्हर फ्लो होते. तसा गोदावरीचा प्रवाह वाढतो. त्यावेळी बेझे येथून आणलेले पाणी नदीत सोडल्याने नदीच्या पुरात आणखी वाढ होईल, याकडे प्रशासनाचे दर्लक्ष होत आहे.