‘घुसखोर’ पोलिसावर पोलिसांची कारवाई

महाराष्ट्र टाइम्स
‘घुसखोर’ पोलिसावर पोलिसांची कारवाई
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
दिव्यांगांसाठी राखीव डब्यात बिनधास्त प्रवास करायचा, विरोध करणाऱ्या प्रवाशाशी हुज्जत घालायची असा प्रकार सर्वसामान्य प्रवाशांकडून नेहमी होत असल्याची तक्रार असते. असे करणाऱ्या एका प्रवाशावर पोलिसांनी नुकतीच कारवाई केली. दादर रेल्वे पोलिसांनी संबंधित प्रवाशाचा शोध घेऊन त्याच्यावर रेल्वे अधिनियमांतर्गत कारवाई करत दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला. विशेष म्हणजे, दोषी प्रवासी रेल्वे पोलिस कर्मचारी असून तक्रारदाराने केलेल्या पाठपुराव्यामुळे ही कारवाई शक्य झाली आहे.

१८ जून रोजी रात्री सुमारे ८.४५ वाजता दादर स्थानकावरून सुटणाऱ्या ठाणे जलद लोकलच्या कल्याण बाजूच्या दिव्यांगांच्या राखीव डब्यात एक सर्वसामान्य प्रवासी प्रवास करत असल्याचे तक्रारदार नितीन गायकवाड यांच्या निदर्शनास आले. त्याला डब्यातून उतरून जाण्यास सांगितले असता, त्याने नकार देत उद्धट वर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. त्यानंतर या घटनेचे छायाचित्र काढून रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीची गंभीर दखल घेऊन दादर रेल्वे पोलिसांनी दोषी प्रवाशाचा शोध सुरू केला. चौकशीनंतर रोहन शेडगे याची ओळख पटली. चौकशीदरम्यान त्याने आपली चूक मान्य करत भविष्यात असे पुन्हा होणार नसल्याचे पोलिसांना सांगितले.
यानंतर रेल्वे अधिनियमाच्या कलम १५५(१) अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून दोन हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईची माहिती आणि दंडाची पावती दादर रेल्वे पोलिसांनी तक्रारदाराला अधिकृत पत्राद्वारे पाठवली आहे.