प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री

Contributed byम. टा. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री
नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी हा पदभार स्वीकारणार आहेत. परीक्षांच्या पेपरफुटीसाठी कठोर शिक्षेची तरतूद असणारे `सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा २०२६` हे सरकारचे महत्त्वाकांक्षी विधेयक जोशीच लोकसभेत उद्या, सोमवारी सादर करतील, असेही स्पष्ट करण्यात आले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी रात्री धर्मेंद्र प्रधान यांचा मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला त्यानंतर थोड्याच वेळात शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी जोशी यांच्याकडे देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
कर्नाटकातील भाजपचे दिग्गज नेते अशी ओळख असलेले व सध्या केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री असणारे जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर संसदेचे कामकाज विस्कळीत करण्यासाठी विरोधी पक्षांकडे कोणतेही ठोस कारण उरलेले नाही. त्यामुळेच सरकारने शनिवारी रात्री प्रसृत केलेल्या सोमवारच्या प्रस्तावित कार्यक्रम पत्रिकेतही (अजेंडा) याची तयारी दिसून आली आहे. नीट पेपरफुटीचा व प्रधान यांच्या राजीनाम्याचा मुद्दा हातातून गेल्याने विरोधकांची पंचाईत झाल्याचे चित्र आहे.