शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी विजेंद्रकुमार गुप्ता याच्यासह त्याचा साथीदार इंद्रजीत विनयकुमार सिंह या दोघांना बिहारच्या समस्तीपूर येथून पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने शनिवारी या दोन्ही आरोपींना ३० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
गेल्या महिनाभरापासून तपास यंत्रणांना गुंगारा देणारा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागल्याने या प्रकरणातील नवीन माहिती समोर येण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणात आत्तापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या १४ झाली आहे. भिवंडीतील टीईटी पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद देशभर उमटले होते. मुख्य आरोपी विजेंद्र कुमार गुप्ता याचे आग्रा येथील ‘महीम पत्रण’ या छापखान्यातील कर्मचाऱ्यांसोबत आर्थिक हितसंबंध होते. ज्या-ज्या वेळी महत्त्वाचे पेपर या छापखान्यात छापण्यासाठी येत होते, त्या-त्या वेळी निश्चित रक्कम ठरवून आरोपी गुप्ता हा छापखान्यातील कर्मचाऱ्यांकडून पेपर विकत घेत होता. पेपर विकत घेताना कर्मचाऱ्यांना पैसे व इतर प्रलोभने दाखविण्यात येत होती, अशी माहिती भिवंडीचे पोलिस उपायुक्त पवन बनसोड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहायक पोलिस आयुक्त सचिन सांगळे आणि विजय मराठे उपस्थित होते.