सिंहस्थ मेळ्यासाठी अभेद्य सुरक्षा कवच

Contributed byसौरभ बेंडाळेsaurabh.bendale@timesofindia.com,@timesofindia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
सिंहस्थ मेळ्यासाठी अभेद्य सुरक्षा कवच
आगामी सिंहस्थात लाखो भाविकांच्या गर्दीमुळे मोबाइल नेटवर्क ठप्प झाले किंवा एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, तरीही नाशिक पोलिसांचे सुरक्षा जाळे किंचितही खिळखिळे होणार नाही. नाशिक शहर पोलिसांनी सिंहस्थाचे चोख नियोजन केले असून, ‘व्हीआयपी’ दौऱ्यासह सुरक्षेसाठी ‘टॅक्टिकल व्हेइकल’चे कवच राहणार आहे. त्यासाठी दंगल नियंत्रणापासून एआय-आधारित फेस रेकग्निशनने सज्ज असलेल्या पाच टॅक्टिकल वाहनांसह १५९ नवीन वाहनांचा ताफा लवकरच दाखल होत आहे.

नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये सिंहस्थातील कायदा-सुव्यवस्थेसह सुरक्षेबाबत उपायुक्त मोनिका राऊत, किशोर काळे, किरणकुमार चव्हाण, चंद्रकांत गवळी यांनी चोख नियोजन केले आहे. पोलिस महासंचालक सदानंद दाते सातत्याने सिंहस्थ नियोजनावर लक्ष ठेवून आहेत. सिंहस्थासाठी प्रत्येकी ८० लाखांच्या पाच 'टॅक्टिकल व्हेइकल'ची खरेदी होणार असून, त्याचा वापर लष्कर आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांद्वारे महत्त्वाच्या कारवायांत केला जातो. ‘टॅक्टिकल व्हेइकल’ हे विशेषतः डिझाइन केलेले ‘बुलेटप्रूफ’ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेले वाहन आहे. जिथे अचानक गर्दी वाढते, ‘व्हीआयपी’ हालचाली असतात किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते, तिथे ही वाहने त्वरित तैनात केली जातात. त्यानुसार सिंहस्थामध्ये ३५ हजार पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांचे ‘अभेद्य कवच’ पर्वणीवेळी शहरात नियुक्त असेल. पहिल्यांदाच दहशतवादविरोधी पथकासह (एटीएस) 'फोर्स वन'ची विशेष पथके तैनात असतील. प्रत्येक स्नानघाटांसह गर्दीच्या ठिकाणी २७ उपायुक्त (डीसीपी) व १०६ सहाय्यक आयुक्तांसह (एसीपी) इतर कुमक नेमण्यात येणार आहे.