युवाशक्तीसमोर नमते

Contributed byनवी दिल्ली|महाराष्ट्र टाइम्स
युवाशक्तीसमोर नमते
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
नवी दिल्ली : नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी हा पदभार स्वीकारणार आहेत. परीक्षांच्या पेपरफुटीसाठी कठोर शिक्षेची तरतूद असणारे `सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा २०२६` हे सरकारचे महत्त्वाकांक्षी विधेयक जोशीच लोकसभेत उद्या, सोमवारी सादर करतील, असेही स्पष्ट करण्यात आले.

नीट पेपरफुटीप्रश्नी राजधानीपासून देशभरात पसरलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या नेतृत्वाखालील तरुणाईच्या आक्रमक आंदोलनाला शनिवारी मोठे यश मिळाले. पोलिसांकडून लाठीमार, चर्चेच्या फेऱ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट तरुणांशी संवाद साधत विविध निर्णय जाहीर करूनही आंदोलक धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम राहिल्यानंतर अखेर युवाशक्तीसमोर नमते घेत प्रधान यांनी दुपारी आपल्या शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. आंदोलकांच्या अन्य प्रमुख मागण्याही सरकारने मान्य केल्या. यानंतर जंतरमंतर जल्लोषाचे वातावरण होते.
शिक्षणमंत्रिपदाची जबाबदारी आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. २० जून रोजी सुरू झालेले हे आंदोलन पावसाळा अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून तीव्र झाले. मात्र सीजेपीच्या सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर तरुणांमध्ये उत्साह संचारला. प्रधान यांनी राजीनाम्याबाबत ‘एक्स’वर भूमिका स्पष्ट केली. ‘गेल्या १० दिवसांतील घटनांमुळे मी अतिशय दुःखी झालो आहे. मंत्रिपदाचा राजीनामा ही माझ्यासाठी वैयक्तिक प्रतिष्ठेची बाब नाही. राष्ट्रसेवा हे आपल्या आयुष्यातील सर्वोच्च प्राधान्य आहे,’ असे त्यांनी नमूद केले. तर सीजेपीनेही या घडामोडींविषयी सोशल मीडियावर माहिती दिली. ‘नीट परीक्षेच्या पेपरफुटीशी संबंधित आत्महत्यांमधील पीडितांच्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त भरपाई, केंद्र सरकार आणि एनडीएशासित राज्यांत आंदोलक विद्यार्थ्यांवर दाखल केलेले सर्व एफआयआर मागे घेण्यात येतील. आंदोलकांवर भविष्यातही यांसंबंधीची कारवाई केली जाणार नाही, या मागण्यांवर सरकारने सहमती दर्शवली आहे,’ असे सीजेपीने ‘एक्स’वर जाहीर केले. याशिवाय ‘सरकार सीजेपीच्या पाच कलमी परीक्षा सुधारणा सनदेवर विचार करेल आणि या सुधारणांवर अधिक चर्चा करण्यासाठी सीजेपी व सरकार यांच्यात बैठक घेईल,’ असेही त्यांनी सांगितले.

प्रधान यांच्या राजीनाम्यापूर्वी दिल्लीत वेगवान घडामोडी घडल्या. दुपारी गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोघांमध्ये झालेल्या चर्चेनंतर काही वेळातच प्रधान यांनी आपला राजीनामा पंतप्रधानांकडे पाठवला व त्याबाबत ‘एक्स’वर भूमिका मांडली. दुसरीकडे, सीजेपीच्या मागण्यांबाबत त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यापूर्वी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनीही शहा यांची यांची भेट घेतली व चर्चा केली.

‘ही केवळ सुरुवात’

‘धर्मेंद्र प्रधान ही पहिली विकेट आहे, परंतु ही केवळ सुरुवात आहे, आम्ही येथे थांबणार नाही. झुरळांना आव्हान देऊ नका,’ असा इशारा ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजित दीपके यांनी दिला. ‘या देशाच्या तरुणांनी दाखवून दिले की, ते एकत्र आले, तर कोणालाही झुकवू शकतात,’ असेही ते म्हणाले.

सीजेपीचे आंदोलन मागे

केंद्र सरकारने मुख्य मागण्या मान्य केल्यानंतर ३६ दिवस जंतरमंतरवर सुरू असलेले सीजेपीचे आंदोलन मागे घेण्यात आले. देशव्यापी विद्यार्थी आंदोलन तत्काळ प्रभावाने मागे घेण्यात येत आहे, अशी घोषणा सीजेपीने केली. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, जितेंद्र सिंह व सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास व आशुतोष रांका यांच्यामध्ये चर्चेची तिसरी फेरी पार पडली. त्यानंतर सीजेपीच्या नेत्यांनी हे जाहीर केले. जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांनी शांततेने व तत्काळ आंदोलनस्थळावरून जावे, असे आवाहन त्यांनी केले. सीजेपीच्या दोन मागण्यांबाबत त्वरित लेखी आश्वासन केंद्राने दिलेले नाही. मात्र तसे आश्वासन त्यांना मंगळवारपर्यंत दिले जाईल, असे सांगण्यात आले आहे.

संबंधित वृत्त...३, ५, ८

आंदोलनाचा घटनाक्रम

१६ मे : अभिजित दीपके यांनी सोशल मीडियावर व्यंगात्मक स्वरूपात ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या अभियानाची सुरुवात केली.

६ जून : दीपके अमेरिकेतून परतल्यानंतर जंतर-मंतरवर पहिले आंदोलन झाले. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी.

२० जून : जंतर-मंतरवर बेमुदत धरणे आंदोलन सुरू.

२८ जून : लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक जंतर-मंतरवर दाखल झाले आणि सहा विद्यार्थ्यांसह त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले.

१८ जुलै : उपोषणाच्या २१व्या दिवशी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवले; त्यानंतर दीपकेंचे उपोषण.

२० जुलै : पोलिसांशी संघर्ष.

२१ जुलै : काँग्रेस नेते राहुल गांधी यांता आंदोलनाला पाठिंबा, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली

२४ जुलै : केंद्र सरकार आणि सीजेपी नेत्यांमध्ये चर्चा झाली; सरकारला निर्णयासाठी २४ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला.

२५ जुलै : जंतर-मंतरवरील गर्दी वाढत असताना पोलिसांनी कारवाई केली; दुपारी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर अभिजित दीपके यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.

नवी दिल्ली : नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी हा पदभार स्वीकारणार आहेत. परीक्षांच्या पेपरफुटीसाठी कठोर शिक्षेची तरतूद असणारे `सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा २०२६` हे सरकारचे महत्त्वाकांक्षी विधेयक जोशीच लोकसभेत उद्या, सोमवारी सादर करतील, असेही स्पष्ट करण्यात आले.