‘मोदी हे देशाचा भूतकाळ’

महाराष्ट्र टाइम्स
‘मोदी हे देशाचा भूतकाळ’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
‘ नरेंद्र मोदी हे भारताचा भूतकाळ आहेत. भूतकाळ कधीही भविष्याशी लढू शकत नाही’, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केंद्र सरकार व पंतप्रधान मोदींवर टीका केली.

‘ही लढाई मोदी व संघ यांची भूतकाळातली धोरणे आणि भारताचे भविष्य यांच्यात आहे. परंतु भारताचे भविष्य भूतकाळावर विजय मिळवेल अशी मला खात्री आहे’, असेही राहुल म्हणाले.
मोदींनी माफी मागावी: खर्गे

‘हा सत्याचा विजय आणि मोदींच्या हट्टीपणाचा पराभव आहे’, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली. ‘विद्यार्थ्यांचा आवाज अखेर अहंकारी सत्तेच्या दारापर्यंत पोहोचला. पंतप्रधान मोदी यांनी तरुण पिढीची माफी मागावी आणि त्यांच्यावर लाठीमार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी’, असेही खर्गे म्हणाले.

इन्स्टाग्राम व्हिडीओ मूर्खपणाचे: प्रियांका वड्रा

‘पंतप्रधान मोदींनी मूर्खपणाचे इन्स्टाग्राम व्हिडीओ करण्याऐवजी विद्यार्थ्यांची माफी मागावी’, अशी मागणी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केली. ‘विद्यार्थ्यांचा आक्रोश सुरू असताना पंतप्रधान इन्स्टाग्रामवर अधिक मित्र जोडल्याबद्दल लोकांचे आभार मानत आहेत. देशभरातील तरुण रस्त्यावर उतरले अशा वेळी हे करणे पूर्णपणे हास्यास्पद आहे’, असे त्या म्हणाल्या.

ही तर क्रांती: अखिलेश

‘भाजप नकारात्मक राजकारणावर पैसा खर्च करत आहे’, असा आरोप समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला. ‘हा (प्रधान यांचा) राजीनामा नाही तर ही क्रांती आहे. देशाची परीक्षा प्रणाली मजबूत करण्याची जबाबदारी सरकारची आहे. तरुणांसाठी रोजगाराचे नवीन मार्ग शोधावे लागतील’, असेही ते म्हणाले.

युवाशक्तीच्या ऐक्याचा विजय: शरद पवार

‘दडपशाहीविरोधात निर्भयपणे आणि खंबीरपणे लढलेली ही लढाई, ज्याने सरकारला अन्यायाची नैतिक जबाबदारी स्वीकारण्यास भाग पाडले हे लोकशाहीच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे’, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. ‘देशातील युवाशक्तीच्या एकतेचा हा एक मोठा विजय आहे. देशात लोकशाहीचा विजय झाला आहे आणि याचे श्रेय निःसंशयपणे देशाच्या तरुण पिढीला जाते’, असे ते म्हणाले.