भारताचा मालिकाविजय

Contributed byहरारे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
भारताचा मालिकाविजय
ईशान किशन, तिलक वर्मा यांची तडाखेबंद अर्धशतके आणि अभिषेक शर्मा, यश ठाकूर, प्रिन्स यादव यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने शनिवारी टी-२० क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या सामन्यात यजमान झिम्बाब्वेवर ९० धावांनी मात केली. यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

हरारे स्पार्ट्स क्लबमध्ये ही लढत झाली. भारताने झिम्बाब्वेसमोर २२० धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा डाव १२९ धावांत आटोपला. भारतासाठी हा समाधानकारक विजय ठरला. फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारल्यानंतर गोलंदाजांनी झिम्बाब्वेच्या फलंदाजांवर दडपण आणले आणि सहज विजय साकारला. प्रिन्स यादवने आठ चेंडूंत दोन विकेट घेतल्या. पायाचा स्नायू दुखावल्याने, त्याला मैदान सोडावे लागले.
तत्पूर्वी, झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यांनी अभिषेक आणि गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला लवकर बाद केले. मात्र, त्यानंतर ईशान किशनने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी ४२ चेंडूंत ६६ धावांची भागीदारी रचली. बेनेटने श्रेयसला बाद केल्यानंतर, ईशानने तिलकच्या साथीने ४४ चेंडूंत ९४ धावांची भागीदारी रचली. त्या जोरावरच भारताने द्विशतकी टप्पा पार केला. ईशान किशनने ४४ चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षटकारांसह ८१ धावांची, तिलकने २९ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद ६० धावांची खेळी केली.

धावफलक : भारत - वैभव सूर्यवंशी झे. मुझारबानी गो. एन्गारवा २०, अभिषेक शर्मा झे. बर्ल गो. मुझारबानी ८, ईशान किशन झे. बेनेट गो. न्यूमन ८१, श्रेयस अय्यर झे. इव्हान्स गो. बेनेट २५, तिलक वर्मा नाबाद ६०, रिंकूसिंह झे. बर्ल गो. इव्हान्स १२, शिवम दुबे नाबाद ६; अवांतर - ७; एकूण - २० षटकांत ५ बाद २१९

गोलंदाजी : रझा ४-०-४७-०, मुझारबानी ४-०-३६-१, एन्गारवा ३-०-४३-१, इव्हान्स ४-०-४४-१, न्यामहुरी ३-०-२२५-१ बेनेट २-०-२२-१

झिम्बाब्वे - ब्रायन बेनेट झे. ईशान किशन गो. यश ३२, बेन करन झे. दुबे गो. प्रिन्स १, मायर्स त्रि. गो. रवी बिश्नोई १२, रायन बर्ल झे. रिंकू गो. तिलक २०, रझा झे. ईशान गो. प्रिन्स ०, वेसली मधेवेरे झे. अय्यर गो. दुबे २, मारुमनी त्रि. गो. यश २४, ब्रॅड इव्हान्स त्रि. गो. अभिषेक १९, न्यूमन न्यामहुरी त्रि. गो. अभिषेक ३, रिचर्ड एन्गारवा झे. रिंकू गो. अभिषेक १, ब्लेसिंग नाबाद ७; अवांतर - ८; एकूण - १७.५ षटकांत सर्व बाद १२९

सामनावीर : ईशान किशन.