‘अपघातातील सत्य बाहेर आणणार’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
ajit pawar plane accident investigation truth will come out
मुंबई : ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील सत्य बाहेर आणल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही. काहीही झाले तरी अपघातामागील सत्य आम्ही बाहेर आणू,’ याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केला.

त्यांच्या विमान अपघातातील चौकशीचा अंतिम अहवाल त्यांच्या पुण्यतिथीपूर्वी अर्थात, जानेवारीपर्यंत सादर होईल यासाठी प्रयत्न केला जाईल, असेही ते म्हणाले.
‘अजित पवार यांच्या बारामतीतील विमान अपघाताचा तपास ‘एएआयबी’कडून सुरू आहे. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ; तसेच अमेरिकेतील संस्थेकडून या अपघाताचा तपास होत आहे. राज्य सीआयडीकडूनही या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. एएआयबीचा अंतिम अहवाल आल्यानंतरच सीबीआय तपास हाती घेऊ शकेल,’ असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.