विधान परिषदेतून पाच सदस्यांना निरोप

महाराष्ट्र टाइम्स
farewell ceremony for five members from legislative council
विधान परिषदेतून निवृत्त होत असलेल्या आमदारांनी त्यांच्या कार्यकाळात नागरिकांच्या हितासाठी केलेले काम आणि विधान परिषदेच्या कामकाजात त्यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केले. निवृत्त होत असलेले आमदार सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आसगावकर या पाच सदस्यांना निरोप देण्यात आला.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘आसगावकर यांनी शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले. शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास आणि शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी केलेले त्यांचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. चव्हाण यांनी विद्यार्थी, बेरोजगार युवक आणि मराठवाड्याच्या विकासाशी निगडित प्रश्न मांडले. युवकांना न्याय मिळावा आणि रोजगाराच्या संधी वाढाव्यात, यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अभिजित वंजारी यांनी सामान्य नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. विद्यार्थी चळवळ, शिक्षण, समाजकारण; तसेच कोविड-१९ काळात वैद्यकीय मदत, अन्नधान्य आणि गरजूंना दिलेल्या साह्यामुळे त्यांनी लोकाभिमुख नेतृत्वाची ओळख निर्माण केली. अरुण लाड यांनी सहकार, शिक्षण आणि समाजकारण या क्षेत्रांत योगदान दिले.’