मुंबई : देशाचा परकीय चलनसाठा ३ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात ७.२६ अब्ज डॉलरने वाढून ६७४.१९३ अब्ज डॉलरवर पोहोचला, असे रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी सांगितले. यापूर्वीच्या अहवाल आठवड्यात परकीय चलनसाठा ५.६५४ अब्ज डॉलरने घसरून ६६६.९३३ अब्ज डॉलरवर आला होता.
मध्यपूर्व संघर्ष सुरू होण्यापूर्वी, यावर्षी २७ फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात हा साठा आजवरच्या उच्चांकी ७२८.४९४ अब्ज डॉलरवर पोहोचला होता. त्यानंतर रुपयावर दबाव आल्याने आणि आरबीआयला डॉलरची विक्री करून परकीय चलन बाजारात हस्तक्षेप करावा लागल्याने अनेक आठवडे साठ्यात घट झाली. ३ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात साठ्याचा प्रमुख घटक असलेली परकीय चलनमत्ता ४.५१ अब्ज डॉलरने वाढून ५४५.५७८ अब्ज डॉलरवर पोहोचली. या आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य २.६६९ अब्ज डॉलरने वाढून १०५.२०५ अब्ज डॉलरवर पोहोचले. विशेष आहरण अधिकार (एसडीआर) ६५ दशलक्ष डॉलरने वाढून १८.६२३ अब्ज डॉलरवर पोहोचले.