Hydrogen Fuel A New Chapter In Indian Transportation
हायड्रोजन इंधन देशातील वाहतुकीचे भविष्य
Contributed by: केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘हायड्रोजन हे वाहतूक उद्योगाचे भविष्य असून, त्याच्या इंधन म्हणून वापरासाठी सरकार देशभरातील दहा मार्गांवर चाचण्या घेत आहे,’ असे केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. गांधीनगरमध्ये ‘प्रवास ५.०’ आणि ‘भारत प्रवास पुरस्कार’ कार्यक्रमात ते बोलत होते.
हायड्रोजन हे भविष्यातील इंधन असल्याची खात्री व्यक्त करून, यावर काम सुरू असल्याचे गडकरी यांनी सांगितले. ‘पर्यायी इंधन आणि जैवइंधन क्षेत्रात उद्योग खूप चांगले काम करीत आहे आणि भारत आपल्या तंत्रज्ञान व खर्चाच्या बळावर जागतिक स्तरावर आघाडी घेईल,’ असेही गडकरी म्हणाले. ‘बस विकसित करण्यासाठी वाहन उद्योगाने घेतलेले पुढाकार खूप महत्त्वाचे आहेत. वाजवी आर्थिक मूल्यात अधिक आराम देणे हे आमच्या उत्पादकांचे कर्तव्य आहे. सुरक्षित वाहतूक ही महत्त्वाची बाब आहे,’ असे सांगून गडकरी यांनी रस्ते अपघात रोखण्यासाठी वाहन उद्योगाला मदतीसाठी आवाहन केले. ‘देशात तीन लाख बसची आवश्यकता आहे, त्यामुळे उत्पादकता तिप्पट वाढवावी लागेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आपले मंत्रालय खासगी बसपोर्ट बांधण्यावरही काम करीत आहे, असे ते म्हणाले. ‘हरित एक्स्प्रेस महामार्गांमुळे प्रवासाचा वेळ कमी होईल,’ असेही गडकरी सांगितले.
कोठे चाचण्या?
ग्रेटर नोएडा - दिल्ली - आग्रा, भुवनेश्वर - कोणार्क - पुरी, अहमदाबाद - बडोदा- सुरत, साहिबाबाद - फरिदाबाद - दिल्ली, पुणे - मुंबई, जमशेदपूर - कलिंगानगर, तिरुअनंतपुरम - कोची, कोची - एडापल्ली, जामनगर - अहमदाबाद, एनएच - १६ विशाखापट्टणम - बय्यावरम या मार्गांवर चाचण्या सुरू आहेत.