Important Directives From The Court To The Federation
फेडरेशनची आडकाठी चुकीची
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
संपूर्ण अभिन्यासावर हस्तांतरणाच्या माध्यमातून हक्क निर्माण झाल्याच्या कारणाखाली हाऊसिंग सोसायट्यांचे फेडरेशन हे सोसायटीच्या पुनर्विकासाच्या हक्कात बाधा निर्माण करू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने ठाण्यातील एका संकुलाच्या प्रकरणाच्या निमित्ताने दिला आहे. तसेच चार इमारतींच्या सोसायटीला विनाअट ‘ना हरकत’ प्रमाणपत्र (एनओसी) देण्याचा आदेशही फेडरेशनला दिला आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोड येथील विजय नगरी संकुलातील विजय नगरी को-ऑपरेटिव्ह सोसायटी ही विजय नगरी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज फेडरेशन लिमिटेडचाच भाग आहे. फेडरेशनमध्ये सात इमारतींचा समावेश आहे, तर इमारत क्रमांक १ ते ४ मिळून सोसायटी स्थापन केली आहे. फेडरेशनला ४ जुलै २०२२ रोजीच्या आदेशाद्वारे संपूर्ण अभिन्यासाचा हस्तांतरण हक्क मिळाला होता. मात्र, फेडरेशनकडून एकत्रित पुनर्विकासाच्या ठोस हालचाली होत नसल्याचे पाहून, सोसायटीने आपला स्वतंत्र प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर फेडरेशनने परवानगी नाकारली आणि ‘एनओसी’ची अट घातली. त्यामुळे संपूर्ण अभिन्यासाचा फेडरेशनचा हस्तांतरण हक्क रद्दच करावा आणि आम्हाला आमच्या क्षेत्रफळापुरते अभिहस्तांतरण मंजूर करावे, असा अर्ज सोसायटीने सक्षम प्राधिकाऱ्याकडे केला आणि तो मंजूरही झाला. त्याविरोधात फेडरेशनने पूर्वी उच्च न्यायालयात याचिका केली होती. फेडरेशनला आधीच हस्तांतरण झाले असताना, सोसायटीला अभिहस्तांतरणासाठी अर्ज करता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने सोसायटीचे अभिहस्तांतरण रद्द केले. मात्र, फेडरेशनला मिळालेल्या हस्तांतरण हक्काला कायदेशीर आव्हान देता येईल, अशी मुभाही सोसायटीला दिली. त्या पार्श्वभूमीवर, सोसायटीने याचिका केली होती. त्याविषयीच्या सुनावणीअंती न्या. संदीप मारणे यांनी हा निर्णय दिला. ‘आपल्याच फेडरेशनला मिळालेला हक्क रद्द करावा, अशा विनंतीची ही विचित्र याचिका आहे’, असे नमूद करत न्यायमूर्तींनी या संपूर्ण प्रकरणाचा कायदेशीर उहापोह केला. फेडरेशनने सोसायटीला त्यांच्या वाट्याच्या २१.६२ टक्के भूभागावरच पुनर्विकास करण्यास ‘एनओसी’ देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे न्या. मारणे यांनी फेडरेशनचा हस्तांतरणाचा हक्क रद्द करण्याचा आदेश देण्याचे टाळले. काही निर्देश देऊन सोसायटीची याचिका निकाली काढली.