Inauguration Of Grain Warehouses By Union Cooperation Minister Amit Shah
धान्य गोदामांचे लोकार्पण
Contributed by: सहकार आयुक्त|महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
जगातील सर्वांत मोठी साठवण योजना आणि कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेंतर्गत राज्यात तीन धान्य गोदामे बांधून पूर्ण झाली आहेत. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते नुकतेच दूरदृश्यप्रणालीद्वारे या गोदामांचे लोकार्पण करण्यात आले. पुणे, अमरावती आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ही धान्य गोदामे आहेत. गोदाम परिसरातील शेतकऱ्यांना सुरक्षित, वैज्ञानिक आणि आधुनिक धान्य साठवणुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे.
आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताह; तसेच केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या पाचव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून देशभरातील २३२ धान्य गोदामांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आले. त्यामध्ये राज्यातील तीन धान्य गोदामांचा समावेश आहे. जुन्नर तालुक्यातील बेल्हे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित येथे ५०० टन क्षमतेचे धान्य गोदाम उभारण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील भापकिया आणि गडचिरोली जिल्ह्यात चार्मोशी येथे गोदाम उभारणी करण्यात आली आहेत. या गोदामांमुळे कृषी उत्पादनाचे मूल्यवर्धन, दर्जेदार साठवण आणि प्रभावी विपणनास चालना मिळणार आहे. सहकारी संस्थेच्या व्यवसायवृद्धीबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासही या प्रकल्पाची मदत होणार आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषद आणि भारतीय बीज सहकारी समिती मर्यादित यांच्यात केळी टिश्यू कल्चर प्रयोगशाळा उभारणीसंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील हिंगोणे येथे सुमारे १.२५ कोटी केळीच्या टिश्यू कल्चर रोपांची वार्षिक निर्मिती क्षमता असलेली प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.