दरेकर- बच्चू कडूंमध्ये पुन्हा खडाजंगी

महाराष्ट्र टाइम्स
intense argument between darekar and bachchu kadu
विधान परिषदेत सत्ताधारी आमदारांमध्येच सुरू असलेल्या वादाचा आणखी एक अंक अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशीही पार पडला. भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर आणि शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांच्यात पुन्हा एकदा वादावादी झडली. दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला, की अखेर सभापतींना उभे राहून दोघांनाही शांत करावे लागले.

प्रश्नोत्तरांच्या तासात ठाणे जिल्ह्यातील दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील मेंदे बीजपाडा या आदिवासी पाड्यातील गर्भवती आदिवासी महिलेचा वेळेवर वैद्यकीय उपचार व रुग्णवाहिका न मिळाल्याने तिचा आणि तिच्या नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना एप्रिल २०२३ मध्ये घडली होती. याविषयीचा प्रश्न आमदार चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. या प्रश्नाचे उत्तर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर देत असतानाच आमदार बच्चू कडू बोलण्यास उभे राहिले. यावर प्रवीण दरेकर यांनी आक्षेप घेतला. ‘कडू सभागृहात सातत्याने मंत्री बोलत असताना व्यत्यय आणतात. हे खपवून घेतल जाणार नाही. चित्रा वाघ पोटतिडकीने बोलत आहेत, मग कडूंना मध्ये बोलण्याची गरज काय आहे,’ अशी आक्रमक भूमिका आमदार दरेकर यांनी घेतली. त्यावर बच्चू कडू यांनीही प्रत्युत्तर दिले.