Logistics Hub And Industry Development Plan In Western Vidarbha Boosts Local Development
पश्चिम विदर्भात लॉजिस्टिक हब, क्लस्टर
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
पश्चिम विदर्भातील औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून अमरावती येथे पीएम टेक्स्टाइल पार्कला मंजुरी देण्यात आली आहे; तसेच अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आदी जिल्ह्यांमध्ये लॉजिस्टिक्स हब, क्लस्टर विकास आणि गुंतवणूक प्रोत्साहनासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.
आमदार परिणय फुके यांनी पश्चिम विदर्भातील औद्योगिक गुंतवणुकीसंदर्भात प्रश्न उपस्थित केला. मंत्री सामंत यांनी सांगितले, की अमरावती येथे मंजूर झालेल्या पीएम टेक्स्टाइल पार्कसाठी जमीन दरामध्ये कपात करण्यात आली असून उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पश्चिम विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये १०० एकर क्षेत्रावर लॉजिस्टिक्स हब उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अमरावती-बडनेरा परिसरात सुमारे ३०० एकर क्षेत्रात प्रादेशिक लॉजिस्टिक्स हब विकसित करण्याचे काम प्रास्तावित आहे. जिल्हा गुंतवणूक परिषदांच्या माध्यमातून विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार करण्यात आले असून अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.पश्चिम विदर्भातील उद्योगांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी अतिरिक्त सवलती, अनुदान आणि सुविधा याबाबत विचार करण्यासाठी आमदारांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात येणार असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, ‘राज्यात ‘एक तालुका, एक क्लस्टर’ ही संकल्पना राबविण्यात येत असून, आतापर्यंत १९१ ठिकाणी क्लस्टर विकसित करण्यात आले आहेत. या योजनांअंतर्गत ३० ते ७० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. समतोल औद्योगिक विकासासाठी सरकार कटिबद्ध असून उद्योजकांना त्यांच्या गरजेनुसार उद्योग स्थापन करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. ग्रामीण भागात उद्योजकता वाढविण्यासाठी ‘गाव तिथे एक उद्योजक’ ही संकल्पना राबविण्यात येणार असून, उद्योग विभागाकडून जिल्हानिहाय दौरे करण्यात येत आहेत.’