Revolutionary In Video Calling The Journey Of Eric Yuan
व्हिडीओ कॉलिंगचे जग बदलणारा माणूस
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
जच्या डिजिटल युगात ‘झूम’ हा शब्द आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. घरून काम, ऑनलाइन शिक्षण, ऑफिस मिटिंग, वैद्यकीय सल्लामसलत की नातेवाईकांशी संवाद, सर्वांची पसंती असते ती झूमला. या क्रांतिकारी व्हिडीओ कॉलिंग प्लॅटफॉर्मचा प्रणेता आहे एरिक युआन .
चीनच्या शानडोंग प्रांतातील ताईआन शहरात युआन यांचा जन्म २० फेब्रुवारी १९७० रोजी झाला. त्यांनी चीनमधील ‘शेंडोंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी’मधून कॉम्प्युटर सायन्स आणि अप्लाइड मॅथेमॅटिक्समध्ये पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी बीजिंगमधून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. कॉलेजमध्ये असताना ते एका मुलीच्या प्रेमात पडले (जी पुढे त्यांची पत्नी झाली). परंतु वेगवेगळ्या शहरात राहत असल्याने त्यांना भेटणे शक्य होत नसे. त्यावेळी एरिक यांच्या मनात विचार आला की, असे एखादे साधन असावे की ज्याद्वारे मी केवळ एका क्लिकवर तिला पाहू शकेन आणि तिच्याशी संवाद साधू शकेन. यातूनच व्हिडिओ कॉलिंगची पहिली संकल्पना त्यांच्या मनात रुजली.पुढे नव्वदच्या दशकात इंटरनेट क्रांतीची सुरुवात होत होती तेव्हा युआन यांनी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. पण इंग्रजी नीट बोलता येत नसल्यामुळे अमेरिकन दूतावासाने त्यांचा व्हिसा सलग आठवेळा नाकारला. परंतु त्यांनी हार मानली नाही. नवव्या प्रयत्नात यश मिळाले. १९९७मध्ये अमेरिकेत पोहोचल्यावर युआन यांनी वेबेक्स या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग स्टार्टअपमध्ये नोकरी मिळवली. २००७मध्ये सिस्को या मोठ्या टेक कंपनीने वेबेक्स खरेदी केले. पण सिस्कोमध्ये काम करत असताना एरिक यांच्या लक्षात आले की, वेबेक्स वापरणारे ग्राहक समाधानी नव्हते. त्या काळातील व्हिडिओ कॉलिंग सॉफ्टवेअर खूप संथ होते, त्यात अनेक तांत्रिक अडचणी येत असत आणि फोन किंवा लॅपटॉपवर ते नीट चालत नसे. एरिक यांनी सिस्कोच्या व्यवस्थापनाला एक नवीन, मोबाइल-फ्रेंडली आणि सोपा व्हिडिओ कॉलिंग प्लॅटफॉर्म बनवण्याची कल्पना दिली. परंतु सिस्कोने त्यांच्या या कल्पनेकडे दुर्लक्ष केले.
या नकारानंतर युआन यांनी सिस्कोची गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली आणि २०११मध्ये ‘ झूम व्हिडीओ कम्युनिकेशन ’ची स्थापना केली. सुरुवातीला गुंतवणूकदार मिळवणे खूप कठीण गेले. एरिक यांनी सुरुवातीपासूनच त्यांनी झूमची रचना ग्राहकपूरक ठेवली. अॅप डाउनलोड कर, आयडी टाक आणि जॉईन हो. पासवर्ड, लॉगिनची भानगड नाही. शिवाय झूम मोबाइल, लॅपटॉप, टॅब्लेटवर कुठेही चालायचे. कमी इंटरनेट वेगात उत्तम दर्जाचा व्हिडीओ, सहज मीटिंग सुरू करण्याची सुविधा, ४० लोकांपर्यंत फ्री मीटिंग आणि स्क्रीन शेअरिंग यामुळे झूम कॉर्पोरेट जगतात लोकप्रिय होऊ लागले. कंपन्या, शैक्षणिक संस्था आणि सामान्य नागरिकांनी त्याचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार केला.
२०२० मध्ये कोरोनाची साथ आली आणि जगभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. ऑफिस, शाळा, महाविद्यालये एका रात्रीत बंद झाली. अशा वेळी जगाला घरातून काम करण्यासाठी एका खात्रीशीर माध्यमाची गरज होती. झूमने ती पूर्ण केली. कोरोनानंतर झूमचे युजर्स ३० कोटींपार गेले.
अर्थात अफाट लोकप्रियतेसोबतच झूमसमोर ‘सुरक्षा आणि गोपनीयता’संदर्भातील मोठी आव्हाने उभी राहिली. अशावेळी युआन यांनी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन, पासकोड, वेटिंग रूम आणि इतर अनेक सुरक्षाविषयक सुविधा उपलब्ध करून दिल्या.