Congress Demonstrates Against Violence Student Protest
हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस संतप्त
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
दिल्ली येथे नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ तसेच लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेध म्हणून काँग्रेसच्या वतीने बुधवारी शहरात जोरदार आंदोलन केले.
काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होत असलेल्या अन्यायाचा निषेध व्यक्त केला. नीट परीक्षेची पेपरफुटी गंभीर बाब आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शहराध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम यांनी केली. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना प्रतिसाद देण्याऐवजी त्यांच्यावर बळाचा वापर करणे योग्य नाही. विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी, शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी, दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा जनआंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.या वेळी एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके, राजेश मुंढे, अशोक डोळस, इकबालसिंग गिल, नीलेश आंबेवाडीकर, विशाल बन्सवाल, मोहमंद जाकेर, आमेर अब्दुल सलीम, सुरेश पवार, अभिषेक शिंदे, मसरूर खान आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.