२७ गोवंशांची फुलंब्रीत सुटका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
daring action in fulambri results in the rescue of 27 cattle from illegal transportation
फुलंब्री : छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात गोवंशांची बेकायदा वाहतूक , प्राण्यांवरील क्रूरता आणि अवैध कत्तलीस प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत फुलंब्री पोलीस ठाण्याच्या पथकाने २७ गोवंश जनावरांची (बैल) सुटका केली.

जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील चौका बस स्टँड येथे पोलिसांनी संशयास्पद टाटा कंटेनरची तपासणी केली. तपासणी दरम्यान कंटेनरमध्ये २७ बैल दाटीवाटीने कोंबून आणि दोरीच्या साहाय्याने घट्ट बांधून ठेवल्याचे निदर्शनास आले. वाहतुकीसाठी आवश्यक असलेला कोणताही वैध परवाना अथवा कागदपत्रे चालकाकडे उपलब्ध नव्हती. ही जनावरे बेकायदा कत्तलीच्या उद्देशाने नेली जात असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कंटेनर ताब्यात घेऊन सर्व जनावरांची सुटका केली. यात दोन आरोपींना अटक करण्यात आली असुन इरफान शेख मेहमूद (रा. ईदगाहनगर, ता. सिल्लोड), अस्लम सुपडू कुरेशी (रा. ईदगाहनगर, ता. सिल्लोड) अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेल्या सर्व २७ गोवंश जनावरांना सुरक्षिततेसाठी आणि पुढील देखभालीसाठी ‘मातोश्री प्रयागबाई जाधव गौशाळा, पाल’ येथे नेण्यात आले.
ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रताप नवघरे, पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते, ग्रेड पोलिस उपनिरीक्षक राजेश दवंगे, तसेच पोलिस अंमलदार नांगलोत, शिंदे, घुसिंगे, गायकवाड, मसलकर, कांबळे, वक्ते आणि आरखडे यांच्या पथकाने केली.