बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : खासगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. ही घटना २१ जुलै रोजी अदालत रोडवरील सिग्नलजवळ रात्री सव्वादोन वाजेच्या सुमारास घडली. गणेश निर्मळ (वय २०) असे मृताचे नाव आहे. फिर्यादी हरी महानकार यांच्या तक्रारीनुसार, फिर्यादी यांचा भाचा गणेश निर्मळ व त्याचा मित्र अक्षद जाधव हे दोघे जाधव याच्या दुचाकीवरुन फुड डिलेव्हरीसाठी जात होते. त्यावेळी भरधाव आलेल्या खासगी ट्रॅव्हल्स बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात गणेश व अक्षद हे दोघे गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान गणेश याचा मृत्यू झाला. अपघातानंतर बसचालक शेख रियाज शेख अली हा अपघाताची खबर न देता अपघातस्थळी वाहन सोडून पळून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी बसचालक शेख रियाज शेख अली विरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाऊ- बहीण जखमी
छत्रपती संभाजीनगर : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार भाऊ, बहीण जखमी झाले. हा अपघात रेल्वे स्टेशन रोडवर घडला. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरमितकौर ढिल्लन याने दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी हे बहीणीसोबत दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी भरधाव आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात फिर्यादी व त्यांच्या बहीणीला दुखापत झाली तसेच त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

विवाहितेचा छळ

छत्रपती संभाजीनगर : घर नावावर करून देण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी तक्रारीवरुन शेख कफील शेख नसीम यासह सासरच्या सहा जणांविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विवाहितेच्या तक्रारीनुसार आरोपीतांनी संगनमत करुन फिर्यादीला शिवीगाळ करुन मारहाण केली, जिवे मारण्याची धमकी देत शारीरिक व मानसिक छळ केला तसेच फिर्यादी यांच्या वडिलांच्या नावे असलेले घर शेख कफील शेख याच्या नावावर करुन दे नाही तर, फिर्यादीला सांभाळणार नाही, असे फिर्यादीला फोन वर तलाक दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.