कर्करुग्णालयात शिबिराचे उद्घाटन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
कर्करुग्णालयात शिबिराचे उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण राज्यात २२ जुलै ते एक ऑगस्ट या कालावधीत विशेष आरोग्य तपासणी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाची सुरुवात बुधवारी राज्य कर्करोग संस्थेतील कर्करोग तपासणी शिबिराने झाली.

दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मॅमोग्राफीद्वारे कर्करोग निदान तपासणी शिबिराचे उद्घाटन झाले. या प्रसंगी महापौर समीर राजूरकर, अभ्यागत समिती अध्यक्ष आमदार प्रदीप जैस्वाल, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, महापालिका आयुक्त अमोल येडगे, अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, स्थायी समितीचे सभापती अनिल मकरीये, किशोर शितोळे, नगरसेवक शंकर म्हात्रे, किशोर मानकापे, जालिंदर शेंडगे, सुरेद्र कुलकर्णी, अभ्यागत समिती सदस्य राजू अहिरे तसेच कर्करुग्णालयातील विभागप्रमुख, डॉक्टर, अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात सावे यांनी यापुढेही कर्करुग्णालयाला मदत करण्याची ग्वाही दिली. तर, राजूरकर यांनी गोरगरीब कर्करुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेली औषधी देणगी स्वरूपात देऊन समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन कर्करुग्णांच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन केले. कार्यक्रमात डॉ. सुक्रे यांनी कर्करुग्णालयातील सेवांची माहिती दिली. क्ष-किरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. अंजली वासडीकर यांनी मॅमोग्राफी तपासणीबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. रश्मी बंगाली यांनी, तर प्रास्ताविक डॉ. गायकवाड यांनी केले. डॉ. ऋषिकेश खाडीलकर यांनी आभार मानले.