शहराला मिळाले ३५ वर्षांनंतर नवीन योजनेतून पाणी

महाराष्ट्र टाइम्स
शहराला मिळाले ३५ वर्षांनंतर नवीन योजनेतून पाणी
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
अधिक माहिती देताना जीव्हीपीआर कंपनीचे महाव्यवस्थापक महेंद्र गोगुलोथू म्हणाले, नक्षत्रवाडी येथील ‘एमबीआर’मध्ये एक कोटी १५ लाख लिटर (११.५ एमएलडी) पाणी आहे. या एमबीआरमधून १५०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून हर्सूलपर्यंत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. एमबीआर ते हर्सूल पर्यंत १८ किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात आली आहे. एकावेळेस चार एमएलडी या प्रमाणे दिवसातून तीन वेळा (एकूण १२ एमएलडी) पाणी उपलब्ध करुन देण्याची यंत्रणा उभारण्यात आली आहे. सध्या अस्तित्वातील पाणी पुरवठा योजनेतून ३५ एमएलडी पाणी वाढवून दिले जात आहे, त्यात १२ एमएलडी पाण्याची भर पडणार आहे. सिडको एन ५ येथील आर २, आर ३ जलकुंभ, मिसारवाडी, हर्सूल जलशुध्दीकरण केंद्र, हरसिध्दी , हिमायत बाग, सिडको एन ७ येथील आर २, आर ३ जलकुंभ या माध्यमातून संपूर्ण सिडको - हडको परिसर, मिसारवाडी, जटवाडा रस्ता या भागात पाणी पुरवठा होणार आहे. ३० जुलैपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल. सुरुवातीला थोडे गढूळ पाणी येण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा असे आवाहन त्यांनी केले.

छत्रपती संभाजीनगर शहराला तब्बल ३५ वर्षांनंतर नवीन योजनेतून पाणी मिळाले आहे. पाणी मिळाल्याबद्दल सिडको एन ५ येथील जलकुंभाच्या परिसरात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. ३० जुलैपर्यंत संपूर्ण सिडको - हडको भागासह मिसारवाडी, हर्सूल, जटवाडा रोडवरील वसाहतींना नवीन पाणी पुरवठा योजनेतून पाणी मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व्हॉल्व सुरू करण्याचा उपक्रम घेण्यात आला.
शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामातील समन्वयाच्या अभावाची कल्पना महापौर समीर राजूरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी १५ जुलै रोजी मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेतली आणि यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय साधून पाणी योजनेचे काम गतीने पूर्ण करण्याचे आणि कामाचा आराखडा दहा दिवसात सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव रंगा नायक शहरात दाखल झाले. दोन दिवस त्यांनी पाणी योजनेच्या कामाची पाहणी केली. अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि देण्यात आलेल्या डेडलाईनमध्ये कोणत्याही परिस्थितीत काम झालेच पाहिजे असे बजावले. रंगा नायक मंगळवारी (२१ जुलै) सायंकाळी मुंबईत परतले.

बुधवारी (२२ जुलै) नक्षत्रवाडी येथील एमबीआरपासून (संतुलित जलकुंभ) १५०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून सिडकोसाठी पाणी सुरु करण्यात आले. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सिडको एन १ येथील पिरॅमिड चौकात पाणी पोहोचले. या ठिकाणी बसवण्यात आलेला व्हॉल्व्ह राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उघडून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला.

पिरॅमिड चौकातील आंदोलनानंतर सर्वजण सिडको एन ५ येथील जलकुंभाच्या परिसरात पोहोचले. या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करुन जल्लोष करण्यात आला. पेढ्यांचे वाटप करण्यात आले.

 उर्वरित मजकूर...३