अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या जेनेरिक औषधांवर टप्प्याटप्प्याने टेरिफ लादण्याची घोषणा केली आहे. देशांतर्गत औषधनिर्मिती वाढवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले जात असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. भारत हा अमेरिकेला जेनेरिक औषधांचा सर्वांत मोठा पुरवठादार असल्यामुळे या निर्णयाचा भारतावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वरील पोस्टमध्ये म्हटले, की एक ऑगस्ट २०२६पासून अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व जेनेरिक औषधांवर दोन वर्षांसाठी शून्य टेरिफ लागू राहील. त्यानंतर वर्षभरासाठी हे टेरिफ १०० टक्के आणि पुढे २०० टक्के केले जाईल. अमेरिकेत जेनेरिक औषधनिर्मिती परत आणण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. ठरावीक कालावधीत कारखाना आणि उपकरणे उभारण्यात अपयशी ठरणाऱ्या कंपन्यांना दंड आकारला जाईल, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, या धोरणाचा उद्देश अमेरिकी नागरिकांच्या हिताचे संरक्षण करणे हा आहे. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीअर यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत, सक्तीच्या मजुरीच्या कथित पद्धती आणि अन्यायकारक व्यापार धोरणांबाबतच्या तपासाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका भारतासह ६० देशांवर १० ते १२.५ टक्के नवे कर लादण्याचा विचार असल्याचे सांगितले.
भारत ‘जगाचे औषधालय’
भारत जगभरातील अनेक देशांना कमी किमतींमधील जेनेरिक औषधांचा पुरवठा करतो. ‘ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह’च्या माहितीनुसार, २०२५मध्ये भारताने अमेरिकेला ९.७ अब्ज डॉलरची औषधे निर्यात केली. ही रक्कम भारताच्या एकूण २५.८ अब्ज डॉलर जागतिक औषध निर्यातीच्या ३८ टक्के आहे. भारतीय जेनेरिक औषधे अमेरिकेत उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, संसर्गजन्य आजार आणि मानसिक आरोग्याशी संबंधित उपचारांसाठी वापरली जातात.
संबंधित वृत्त... ६
मनिला : ‘इराणकडून होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवण्याचा आणि तेथून प्रवास करणाऱ्या जहाजांकडून कर वसूल करण्याचा केला जाणारा दावा हा जगाची अर्थव्यवस्था आणि सागरी प्रवासाच्या स्वातंत्र्यासाठी धोकादायक ठरेल,’ असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी आशियाई देशांच्या नेत्यांना दिला आहे. हा प्रकार जगात आणि विशेषतः या भागात एक धोकादायक पायंडा पाडू शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.