साडेतीनशेहून अधिक टँकरद्वारे पाणी

महाराष्ट्र टाइम्स
water crisis in marathwada supplying water through 357 tankers
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. २० जुलैच्या अहवालानुसार, विभागातील एकूण ९२७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६५, जालना जिल्ह्यात १२४, परभणी ३३, हिंगोली ८८, नांदेड १९८ , बीड ९५, लातूर १९८, तर धाराशिव जिल्ह्यातील १३५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. यात टँकरसाठी १८३ गावांतील १७४ विहिरींचे, तर टँकरव्यतिरिक्त ५३६ गावांतील ७५३ विहिरींचे अधिग्रहण करण्यातआले आहे.

जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू होणार असला तरी मराठवाड्यात सर्वदूर दमदार पाऊस नाही. परिणामी, अनेक गावात पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायम आहे. आजघडीला मराठवाड्यातील परभणी जिल्हा वगळता अन्य सातही जिल्ह्यातील तहानलेल्या २०२ गावे आणि १२४ वाड्यांना ३५७ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. अवघ्या सात दिवसापूर्वी टँकरची संख्या ३०३ च्या घरात होती, हे विशेष.
उन्हाळा सुरू होताच नेहमी प्रमाणे यंदाही विभागातील अनेक भागात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला. नियमित जलस्रोत आटलेल्या गावांची तहान भागविण्यासाठी ग्रामस्थांना टँकरचा आधार घ्यावा लागला. छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ विभागातील जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने टँकरची मागणी झाली. पावसाळा सुरु झाल्यावर टँकरचा प्रश्न निकाली लागेल, आणि जिल्हे टँकरमुक्त होतील, अशी अपेक्षा होती. परंतु जुलै महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरु होणार असला तरी पाणी प्रश्न अनेक भागात कायम आहे. गेल्या आठवड्यात विभागातील एकूण १८२ गावे आणि ११७ वाड्यांना ३०३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला गेला. तर आजघडीला तहानलेल्या गावांसह टँकरच्या संख्येत भर पडल्याने पाणी टंचाईचा प्रश्न अधिक तीव्र होत असल्याचे दिसून आले.

गेल्या तीन ते चार दिवसापासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाने काहीशी हजेरी लावली असली तरी सर्वदूर दमदार पाऊस नाही. परिणामी जिल्ह्यातील ११३ गावे आणि ३६ वाड्यांमध्ये पिण्याचा प्रश्न कायम आहे. या गावांना १५२ टँकरद्वारे पाणी दिले जात आहे.

जालना जिल्ह्यातील देखील तहानलेल्या गावांसह टँकरच्या संख्येत भर पडली आहे. सध्या ७२ गावे आणि ३२ वाड्यांना १०९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. हिंगोली जिल्ह्यातील तीन वाड्यांना एका टँकरद्वारे, नांदेड जिल्ह्यातील ४ गावे आणि १६ वाड्यांना १५ टँकरद्वारे तर बीड जिल्ह्यातील २४ गावे आणि ३७ वाड्यांना ७१ टँकरद्वारे, तर लातूर जिल्ह्यातील एका गावाला एका टँकरद्वारे, धाराशिव जिल्ह्यातील ६ गावांना ८ टँकरद्वारे पाणी दिले जात आहे.