मूक शिक्षक, अनमोल योगदान

Contributed byडॉ. प्रमोद शिंदेबीड|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

डिसेक्शन हॉलमधील प्रत्येक मृतदेह हा विद्यार्थ्यांसाठी एक मूक शिक्षक असतो, जो शब्दही न बोलता आयुष्यभर उपयोगी पडणारे ज्ञान देतो. म्हणूनच देहदान हे केवळ दान नाही, तर भावी पिढ्यांच्या आरोग्यदायी भविष्यासाठी दिलेले अमूल्य योगदान आहे. त्याबद्दल सर्व डॉक्टर आजन्म ऋणी असतात. त्या देहदात्याबद्दल डॉक्टरांना आदर आणि सन्मान असतो.

Maharashtra Times
डिकल कॉलेजच्या प्रथम वर्षात सकाळी घाई असते ती डिसेक्शन हॉल गाठण्याची. हातात ॲप्रन, स्काल्पेल आणि कॅनिंगहम यांचे प्रॅक्टिकलचे पुस्तक घेऊन लगबग सुरू असते. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर घडविण्याची प्रक्रिया शिस्तबद्ध आणि जबाबदारीची असते. एक कुशल डॉक्टर केवळ पुस्तकातील ज्ञानाने तयार होत नाही, तर मानवी शरीराची रचना प्रत्यक्ष समजून घेतल्याने त्याचे शिक्षण परिपूर्ण होते. यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शरीररचना शास्त्र शिकवताना मानवी मृतदेहाचे डिसेक्शन केले जाते. हे मृतदेह म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्यासाठी केवळ अभ्यासाचे साधन नसून, त्यांचे पहिले ‘मूक शिक्षक’ असतात. हे शक्य होते ते देहदान करणाऱ्या महान व्यक्तींमुळे.

देहदान म्हणजे मृत्यूनंतर स्वतःचा देह वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी दान करणे. समाजाच्या आरोग्यसेवेसाठी आणि भावी डॉक्टरांच्या घडणीत देहदान करणाऱ्या व्यक्तींचे योगदान अतुलनीय आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रत्येक वैद्यकीय विद्यार्थी आणि समाजाने मनापासून आदर बाळगणे आवश्यक आहे.
वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पहिला मोठा अनुभव मिळतो तो डिसेक्शन हॉलमध्ये. सुरुवातीला अनेक विद्यार्थ्यांना मृतदेह पाहताना भीती, भावनिक ताण जाणवतो. मात्र, हळूहळू त्यांना हे समजते, की हा देह त्यांच्यासाठी ज्ञानाचा खजिना आहे.

पुस्तकांमधील चित्रे आणि आकृत्या शरीराची माहिती देतात; पण प्रत्यक्ष अवयव, स्नायू, रक्तवाहिन्या आणि मज्जातंतू पाहिल्याशिवाय त्यांची खरी रचना समजत नाही. विच्छेदनामुळे विद्यार्थ्यांना शरीराचे त्रिमितीय ज्ञान मिळते. भविष्यात शल्यचिकित्सक होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शरीररचनेचे अचूक ज्ञान अत्यंत आवश्यक असते. विच्छेदनातून मिळालेले प्रशिक्षण शस्त्रक्रिया कौशल्याचा पाया बनते.

विच्छेदन करताना अत्यंत बारकाईने निरीक्षण करावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संयम, शिस्त, अचूकता आणि जबाबदारीची भावना विकसित होते. मृतदेहाशी प्रत्यक्ष संपर्क आल्यामुळे विद्यार्थ्यांना जीवन आणि मृत्यूचे वास्तव समजते. त्यामुळे रुग्णांबद्दल अधिक सहानुभूती, संवेदनशीलता आणि मानवतावादी दृष्टिकोन निर्माण होतो. विच्छेदन बहुतेक वेळा गटाने केले जाते. त्यामुळे सहकार्य, परस्परआदर आणि सामूहिक जबाबदारीची भावना विकसित होते; तसेच मृतदेहाबद्दल आदर राखण्याची नैतिक शिकवणही मिळते. फक्त मैत्री नाही, तर काही जोड्याही जमतात या टेबलाजवळ.

वैद्यकीय शिक्षणात देहदान करणाऱ्या व्यक्तींचे स्थान अत्यंत उंच आहे. त्यांचे योगदान अनेक प्रकारे महत्त्वाचे ठरते. एक देह अनेक विद्यार्थ्यांना शरीररचना शिकण्याची संधी देतो. त्यामुळे भविष्यात हजारो रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर तयार होतात. नवीन शस्त्रक्रिया तंत्र, उपचारपद्धती आणि संशोधनासाठी मानवी शरीराचा अभ्यास आवश्यक असतो. देहदानामुळे संशोधनाला मोठी मदत मिळते.

मृत्यूनंतरही इतरांच्या भल्यासाठी आपले शरीर दान करणे ही मानवतेची सर्वोच्च सेवा आहे. देहदानातून प्रत्यक्ष ज्ञाननिर्मिती होते. वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी विच्छेदन कक्षातील मृतदेह हा केवळ ‘शव’ नसतो. तो त्यांचा पहिला मूक शिक्षक असतो. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अत्यंत सन्मानाने आणि नियमांनुसार मृतदेहाचा शिक्षणासाठी वापर होतो.

देहदान हा मृत्यूनंतरही समाजासाठी जगण्याचा संदेश आहे. एखाद्या व्यक्तीचा देह शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ शकतो, अनेक संशोधनांना दिशा देऊ शकतो आणि डॉक्टरांच्या घडणीत मदत करू शकतो. देहदान करणाऱ्या व्यक्तीच्या उदात्त निर्णयामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना ज्ञान मिळते, कुशल डॉक्टर घडतात आणि समाजाला उत्तम आरोग्य सेवा प्राप्त होते.