जालना शहरात मोर्चा

महाराष्ट्र टाइम्स

देशातील पेपरफुटीच्या घटनांचा निषेध

जालना शहरात मोर्चा
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
विविध स्पर्धा व प्रवेश परीक्षांमध्ये वारंवार होत असलेल्या पेपरफुटी आणि गैरप्रकारांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, मानसिक व आर्थिक नुकसान होत आहे. अनेक वर्षे कठोर परिश्रम करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला जात असून, परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, विश्वासार्ह आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

देशभरात वाढत्या पेपरफुटीच्या घटनांविरोधात विद्यार्थी व युवकांनी शहरात मोर्चाचे आयोजन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मस्तगड येथून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
या वेळी घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

सरकारला दिलेल्या निवेदनात जंतर मंतर येथे लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या लाठीमाराचा निषेध नोंदविण्यात आला. शांततेच्या मार्गाने आपल्या न्याय्य मागण्या मांडणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

राष्ट्रीय परीक्षा एजन्सी बरखास्त करून सर्व परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकारांची उच्चस्तरीय, निष्पक्ष चौकशी करणे, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करणे, परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करणे, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, पेपरफुटीमुळे गंभीर परिणामांना सामोरे गेलेल्या व मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व न्याय द्यावा; तसेच जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवरील लाठीमाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

या मोर्चात ‘विद्यार्थी युवक संघर्ष समिती’चे जितेंद्र पाटेकर, गणेश दाभाडे, लक्ष्मीकांत पैंजने, अशोक भारती, मुजीब शेख, पूनम लांडगे, अनिल मिसाळ, जीवन दांडगे, पवन दांडगे, अंगद धनवे यांच्यासह विद्यार्थी होते.