पावसाचे आगमन होताच, शहरात डेंग्यूचा उद्रेक पहायला मिळत असून, जुलैच्या तीन आठवड्यात २२ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूच्या संशयितांचा आकडा २६० पर्यंत पोहचला आहे. त्यामुळे डेंग्यूबाधित रुग्णांचा आकडा आता ४५ वर पोहोचला आहे. दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर एकीकडे डेंग्यूसह साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले असताना धूरफवारणी मात्र कागदावरच होत असल्याचे चित्र आहे. जुलै महिन्यात चिकनगुनियाचेही २ रुग्ण आढळून आले असून, साथीच्या आजाराने डोकं वर काढल्याचे चित्र आहे.
शहरात दरवर्षी पावसाळा आला की डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारख्या किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव होतो. एडिस एजिप्ती नावाचे मादी डास डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत ठरतात. या डासांचा प्रादुर्भाव स्वच्छ पाण्यात होतो. यंदाही नाशिकककरांना डेंग्यूचा डंख लागला आहे. घरांच्या परिसरातील भंगार साहित्य, निकामी टायर्स, शोभेच्या झाडांच्या कुंड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून त्यात डेंग्यूस कारणीभूत ठरणाऱ्या डासांची पैदास झाल्याने नाशिककरांना डेंग्यूची लागण झाली आहे. जुलै महिन्यात पावसाळा सुरू होताच जुलैच्या गेल्या २१ दिवसांतच डेंग्यू सदृश आजाराचे २३८ रुग्ण आढळले होते. प्रयोगशाळेतील रक्त नमुन्यांच्या तपासणीअंती २२ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले. याचाच अर्थ डेंग्युचा दररोज एक नवा रुग्ण आढळत आहे, तर डेंग्यू पाठोपाठ नाशिकला चिकनगुनियाचीदेखील लागण झाली आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत चिकनगुनियाचे दोन रुग्ण आढळून आले असून, जानेवारीपासून पाच रुग्ण झाले आहेत. आतापर्यंत चिकनगुनियाचे ६२४ संशयित निष्पन्न झाले आहेत. सोबतच तापसदृश आजाराच्या रुग्णांचा आकडा हा मोठा असून, त्यांची नोंद मात्र होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होताच, शहरात साथीच्या आजारांनी उच्छाद मांडल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे महापालिकेकडून होणारी धूर फवारणी मात्र कागदावरच होत असल्याचे चित्र आहे. खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या डेंग्यू रुग्णांची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला कळविणे संबंधित रुग्णालयांवर बंधनकारक आहे. मात्र, अनेक खासगी रुग्णालये ही माहिती कळवित नाहीत. त्यामुळे डेंग्यूच्या प्रादुर्भावाचा निश्चित आकडा समोर येऊ शकलेला नाही. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंद असलेल्या आकडेवारीपेक्षा डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कितीतरी पटीने अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.