बनावट मेसेजद्वारे फसवणूक

Contributed byनाशिक|महाराष्ट्र टाइम्स
Maharashtra Times
‘घरबसल्या ऑनलाइन काम करा आणि रोज हजारो रुपये कमवा,’ ‘हॉटेलला रेटिंग्ज द्या अन् ३० टक्क्यांपर्यंत परतावा मिळवा,’ अशा भुरळ पाडणाऱ्या मेसेजचा आधार घेत नाशिक शहरात सायबर चोरट्यांनी नागरिकांना २१ लाख ६३ हजार ५७६ रुपयांना गंडा घातला आहे.

सायबर पोलिस ठाणे आणि देवळाली कॅम्प पोलिसांत या प्रकरणी स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. भगूर येथील ३८ वर्षीय गृहिणीला टेलिग्रामवरून ऑनलाइन टास्क पूर्ण करण्याचे आमिष दाखवून एक लाख ७५ हजारांंना गंडविण्यात आले. एका नागरिकास 'वर्क फ्रॉम होम’च्या नावे भामट्यांनी पाच लाख २३ हजार रुपये उकळले. तिसऱ्या घटनेची सुरुवात व्हॉट्सॲप मेसेजने झाली. तक्रारदाराला क्रिप्टो करन्सीमध्ये ३० टक्के नफ्याचे प्रलोभन दाखवून तब्बल १४ लाख ६४ हजार रुपये लाटण्यात आले.