भारतीयांची आश्वासक सुरुवात

Contributed byग्लासगो|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पहिल्या दिवशी जलतरणपटूंची चांगली कामगिरी

भारतीयांची आश्वासक सुरुवात
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पहिल्या दिवशी भारतीयांना एकही पदक जिंकता आले नाही. मात्र, जलतरणमध्ये आश्वासक सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर बोल्स प्रकारात भारतीय महिलांनी सलग दुसरा विजय मिळवला. मात्र, पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारतीय पदकापासून दूर राहिले.

अशोकचे पदक हुकले
पॅरा पॉवरलिफ्टिंगमधील पुरुषांच्या लाईटवेट गटात अशोक मलिकचे पदक थोडक्यात हुकले. तो अखेरच्या प्रयत्नात २०५ किलो वजन पेलू शकला नाही. त्याने २०० किलो वजन उचलण्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली आणि त्याच्यासह १४३.८ गुण मिळवले. या स्पर्धेत ब्राँझपदक जिंकलेल्या मलेशियाच्या बुन्याऊ गस्टिन याने १५३.५ गुण मिळवताना अशोकला ९.७ गुणांनी मागे टाकले. दरम्यान, याच स्पर्धेत परमजित १३६.५ गुणांसह सातवा आला. त्याने १७६ किलो वजन पेलले होते. तिसऱ्या प्रयत्नात त्याला १७९ किलो वजन उचलता आले नाही. जसप्रीत कौर सहावी, तर सुमनदेवी सातवी आली. जसप्रीतला ९६.४, तर सुमनला ८८.४ गुणांवर समाधान मानावे लागले. नायजेरियाची इस्थर वॉर्गू हिने ११९ गुणांसह सुवर्णपदक जिंकले.

समाधानकारक सुरुवात

भारतीय पुरुष जिम्नॅस्टनी पहिल्या दोन फेऱ्यांनंतर २०८.५५० गुणांसह अव्वल क्रमांक मिळवला आहे. अर्थात, या सांघिक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील उत्तरार्ध अद्याप शिल्लक आहे. त्यात राष्ट्रकुलावर वर्चस्व राखणारे इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स, कॅनडा, सायप्रस, ऑस्ट्रेलिया हे संघ आपले कौशल्य दाखवतील. मात्र त्यानंतरही भारतीय पुरुष संघास अंतिम फेरीची आशा आहे. प्राथमिक टप्प्यानंत तपन मोहंती (७१.७००) तिसरा आणि योगेश्वर सिंग (७१.४००) चौथा आहे.

ज्यूदोकावर तात्पुरती बंदी

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेस भारतीय ज्यूदो संघ रवाना होण्यापूर्वी तुलिका मानला माघार घ्यावी लागली. तिने गत स्पर्धेत ७८ किलोपेक्षा जास्त वजनी गटात रौप्यपदक जिंकले होते. तिच्याकडून जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या ठावठिकाणा नियमाचा १२ महिन्यांत तीनदा भंग झाला. त्यामुळे तिच्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ती राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेस अपात्र ठरली. तुलिकाने विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धेत लक्षवेधक कामगिरी केली होती. त्यामुळे तिच्याकडून पदकाची आशा होती. यापूर्वी उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्यामुळे अरुणकुमारला माघार घ्यावी लागली आहे. भारतीय ज्यूदो संघ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी २७ जुलैस रवाना होणार आहे. भारताचा १४ ज्यूदोकांचा संघ आता १२ जणांचा झाला आहे.

रुपा राणी तिर्की आणि पिंकी यांनी बोल्सच्या महिला दुहेरीत सलग दुसरा विजय मिळवला. त्यांनी द. आफ्रिकेच्या जोडीचे कडवे आव्हान २-० असे परतवले. भारतीयांनी दोन्ही सेटमध्ये ३-४ या पिछाडीनंतर विजय मिळवला. भारतीय जोडीने सलामीच्या लढतीत माल्टाला टायब्रेकरमध्ये हरवले होते. सलग दोन विजयांमुळे भारताने ‘सेक्शन ब’मध्ये अव्वल क्रमांक मिळवला.

रुपा राणी तिर्की आणि पिंकी यांनी बोल्सच्या महिला दुहेरीत सलग दुसरा विजय मिळवला. त्यांनी द. आफ्रिकेच्या जोडीचे कडवे आव्हान २-० असे परतवले. भारतीयांनी दोन्ही सेटमध्ये ३-४ या पिछाडीनंतर विजय मिळवला. भारतीय जोडीने सलामीच्या लढतीत माल्टाला टायब्रेकरमध्ये हरवले होते. सलग दोन विजयांमुळे भारताने ‘सेक्शन ब’मध्ये अव्वल क्रमांक मिळवला.