आँतारिओ : भारताची अव्वल स्क्वॉशपटू अनाहतसिंगने जागतिक ज्युनियर स्पर्धेतील महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. वरिष्ठ महिला क्रमवारीत २०वी असलेल्या अनाहतने इजिप्तच्या हबिबा रिझ्कचा चार गेमच्या लढतीत पराभव केला. गत वर्षी या स्पर्धेत ब्राँझ जिंकलेल्या अनाहतने उपांत्यपूर्व फेरीची लढत ११-७, ११-५, ६-११, ११-९ अशी जिंकली. सलग दोन स्पर्धांत उपांत्य फेरी गाठलेल्या अनाहतला या वेळी विजेतेपदाची चांगली संधी आहे. तिची आता लढत इजिप्तच्या बार्ब सामेहविरुद्ध होईल.
एक टप्पा दूरनवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय मोटोर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया महासंघास राष्ट्रीय क्रीडा महासंघ म्हणून ताप्तुरती संलग्नता दिली आहे. त्यामुळे भारतात एफ वन घेण्याच्या मार्गातील एक टप्पा पूर्ण झाला आहे. आता या महासंघास राष्ट्रीय क्रीडा संहितेनुसार घटना तयार करण्यास सांगितले आहे; त्याचबरोबर संघटनांच्या संलग्नतेबाबतच निकषही शिथिल केले आहेत.
कोकेनचे सेवन
सिडनी : वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून खेळलेल्या ख्रिस्तिया वोल्पातो याने कोकेनचे सेवन केल्याचे चाचणीत सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर त्याच्यावर अतिवेगाने कार चालवल्याचाही आरोप आहे. वोल्पातो याने वर्ल्ड कप खेळण्यासाठी इटलीऐवजी ऑस्ट्रेलियास पसंती दिली होती.
सिंगापूरमध्ये स्पर्धा
बेंगळुरू : भारत आणि सिंगापूरमध्ये ऑगस्ट महिन्यात दोन फुटबॉल लढती होतील. आशियाई वीस वर्षांखालील स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी हे सामने होतील. सिंगापूरच्या सेंटर फॉर स्पोर्ट्स एक्सलन्समधील या लढतींच्या वेळी प्रेक्षकांना प्रवेश नसेल. या लढती ३ आणि ६ ऑगस्टला आहेत.
‘ड्युरँड’ आजपासून
मुंबई : आशियातील सर्वांत जुनी असलेल्या ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धा आज, शनिवारी सुरू होईल. या स्पर्धेत २४ संघांत चुरस होईल. मोहन बागान आणि इस्ट बंगाल यांच्यात कोलकाता येथे सलामीची लढत होईल. २३ ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेतील लढती रांची, गुवाहाटी, शिलाँग आणि इंफाळ येथेही होणार आहेत.