द्राक्ष उत्पादकांना १६ लाखांचा गंडानिफाड : द्राक्ष उत्पादकांना १६ लाख १७ हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या तीन संशयित आरोपींवर ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी सुनील भाऊसाहेब कदम (रा.निपाणी मळा) यांच्यासह एकूण सात शेतकऱ्यांची द्राक्ष व्यापाऱ्यांनी फसवणूक केली आहे. कदम यांचे चार लाख ३० हजार, निवृत्ती राहणे (सुकेने) यांचे सहा लाख २५ हजार, राजेंद्र रघुनाथ शेजवळ यांचे दोन लाख १५ हजार, ऋषिकेश रामनाथ कातकाडे (रा. ओणे) यांचे एक लाख ९७ हजार, आदित्य एकनाथ धनवटे (रा. दात्याणे) यांचे एक लाख ५१ हजार असे एकूण १६ लाख १७ हजार रुपये थकवले आहेत. संशयित हेमंतकुमार सिंग (रा. आरटीओ ऑफिससमोर, वैभवसदन, प्लॉट नं १५, दुर्गानगर, पेठरोड, नाशिक मूळ रा. मोतीहारी, बिहार), नितीन जंगल रासकर (वय ५१ रा.फ्लॅट नं ०२, रामहंस अपार्टमेंट, पंचवडनगर ओझर), कृष्णा रामनाथ निमसे (वय ४७, रा. नांदुरमळा, मदरतेरेसा रोड, आशीर्वाद लॉन्सजवळ नांदुरनाका, नाशिक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
ग्रामपंचायत निवडणुकांना ‘ब्रेक’; याद्या स्थगित
सिन्नर : ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने २४ जुलैला प्रसिद्ध होणाऱ्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांना स्थगिती दिली असून सुधारित कार्यक्रम नंतर जाहीर होणार आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे १५ हजार ग्रामपंचायतींसह सिन्नर तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. १५ जुलैच्या कार्यक्रमानुसार २९ जुलैपर्यंत हरकती घेऊन ४ ऑगस्टला अंतिम यादी जाहीर होणार होती. मात्र एसआयआर-२०२६ पुनरीक्षण प्रक्रिया, तांत्रिक अडचणी आणि अपूर्ण तयारीमुळे निर्णय घेण्यात आला.
आरोग्य व्यवस्थेविरोधात बेमुदत उपोषण
मालेगाव : शहरातील खासगी आरोग्य व्यवस्थेतील अनियमितता व बेकायदेशीर प्रकारांच्या चौकशीच्या मागणीसाठी भाजपचे शहराध्यक्ष देवा पाटील यांनी शुक्रवारी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषण सुरू केले. सोनोग्राफी केंद्रांतील कथित गर्भलिंग निदान, बोगस डॉक्टर, अपात्र आरएमओ, मनमानी बिले, पॅथॉलॉजी लॅबमधील दरपत्रकांचा अभाव, आरोग्य योजनांतील रुग्णांकडून वसुली, मेडिक्लेमसाठी अनावश्यक तपासण्या आणि पोक्सो पीडितांच्या वैद्यकीय तपासणीत होणारा विलंब यावर कारवाईची मागणी त्यांनी केली.







