२९ कॉलेजेसवर प्रवेशबंदी

महाराष्ट्र टाइम्स
२९ कॉलेजेसवर प्रवेशबंदी
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत दिलेले आश्वासन न पाळणाऱ्या २९ महाविद्यालयांवर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने अखेर कारवाईचा आसूड ओढला आहे. शैक्षणिक सत्र २०२६-२७साठी या सर्व महाविद्यालयांमध्ये नवीन प्रवेश घेण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने हा निर्णय घेतला असून, प्रवेशाबाबतची अधिकृत यादी संकेतस्थळावर जाहीर केली आहे.

गेल्या शैक्षणिक वर्षातही (२०२५-२६) या संस्थांवर प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी लवकरच आवश्यक पदभरती पूर्ण करू, असे कायदेशीर प्रतिज्ञापत्र महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे सादर केले होते. मात्र, वर्ष उलटूनही पदभरतीची प्रक्रिया कागदावरच राहिली. या नियमांच्या उल्लंघनामुळे विद्यापीठाने यंदाही ही बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. अधिक माहितीसाठी उपकुलसचिव डॉ. साक्षी ठाकूर यांच्याशी संपर्क साधावा असेही म्हटले आहे.
काहींना अटींवर दिलासाकाही महाविद्यालय ांना पदभरती पूर्ण करण्याच्या अटीवर नामांकन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तात्पुरती शिथिलता देण्यात आली आहे. यात श्रीमती राधाबाई खुटपळे विधी व श्री बच्चुभाऊ कडू महाविद्यालय (जरुड), स्व. आर. जी. देशमुख व दत्त विज्ञान (तिवसा), राष्ट्रीय अल्पसंख्यांक महिला व डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी (अमरावती), सावित्रीबाई फुले विज्ञान (सिंदखेड राजा), कॉलेज ऑफ मॅनेजमेंट व गुंजकर महाविद्यालय (खामगाव), महात्मा ज्योतिबा फुले विज्ञान (संग्रामपूर), संत गजानन बाबा (मोताळा), डॉ. जाकिर हुसैन कला (लोणार), श्री सावळे (लाखनवाडा), श्री संत गजानन महाराज फार्मसी (बुलढाणा), सर्च कॉलेज व ठाकूर रात्रकालीन महाविद्यालय (यवतमाळ), ईकार देशमुख फार्मसी (दिग्रस) आणि विज्ञान महाविद्यालय (रिसोड) यांचा समावेश आहे.